इस्लामपुरात छायाचित्रकाराचा चाकूने भोसकून खून

सराईत गुंडासह त्याच्या दोघा साथीदारांना अटक; इस्लामपूर पोलिसांनी चार तासात मुसक्या आवळल्या
Sangli News
इस्लामपुरात छायाचित्रकाराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.
Published on
Updated on

इस्लामपूर : येथील यल्लमा चौकात किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून छायाचित्रकाराचा खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. गौरव हेमंत कुलकर्णी (वय 24, रा. गणेश मंडईजवळ, इस्लामपूर) असे खून झालेल्या छायाचित्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार सौरभ सुशील पाटील, विजय ऊर्फ सोन्या धुलुगडे (दोघे रा. इस्लामपूर), साजिद जहांगीर इनामदार (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने चार तासात सर्व संशयितांना अटक केली. संशयितांच्या झटापटीत पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, पोलिस अमोल सावंत जखमी झाले. गौरवचे वडील हेमंत यांनी फिर्याद दिली.

गौरव हा येथील कचरे गल्लीत कुटुंबासह वास्तव्यास होता. रविवारी (दि. 26) गौरव व त्याचा मित्र जुबेर मुजावर हे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी कापूसखेड नाका परिसरात संशयित सौरभ पाटील याने त्यांना अडवले. ‘तू जुबेरसोबत का फिरतो? तुला बघून घेतो, तुला जिवंत सोडत नाही’, अशी धमकी सौरभ याने दिली होती. त्यानंतर सोमवारी रात्री सौरभ याने गौरव व त्याचा मित्र प्रतीक कमतगी यांना फोन करून यल्लमा चौकात बोलावून घेतले. त्याठिकाणी सौरभ पाटील, साजिद इनामदार, विजय धुलुगडे हे दुचाकीवरून तेथे गेले. सौरभ पाटील याने गौरव याला बाजूला नेले. त्यावेळी गौरव हा ‘मी आता जुबेरसोबत फिरणार नाही, मला मारू नका’, असे ओरडत सांगत होता. ‘गौर्‍याला लय मस्ती आली आहे, याला आज संपवायचेच’, असे म्हणून साजिद व विजय यांनी गौरवला पकडले. सौरभने चाकूने गौरवच्या पोटात, पाठीत भोसकले. गौरव रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संशयितांनी दुचाकीवरून पलायन केले. त्यावेळी प्रतीक व त्याच्या मित्राने गौरवला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संशयितांच्या चार तासात मुसक्या आवळल्या...

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. कामेरी परिसरात संशयित लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमोल सावंत, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, विशाल पांगे यांचे पथक कामेरी येथे दाखल झाले. संशयित उसाच्या शेताजवळ लपले होते. त्यावेळी संशयितांना ताब्यात घेत असताना त्यांची पोलिसांबरोबर झटापट झाली. त्यावेळी पोलिस निरीक्षक हारुगडे, पोलिस सावंत जखमी झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. चार तासात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

संशयितांकडून घटनास्थळी माहिती

मंगळवारी दुपारी इस्लामपूर पोलिसांनी संशयित सौरभ, विजय, साजिद यांना पोलिस ठाण्यापासून रस्त्याने चालवत यल्लमा चौकातील घटनास्थळापर्यंत नेले. तेथे घटनास्थळावरील घटनाक्रमाची, खुनानंतर शहरात दुचाकीवरून ते कोठे-कोठे गेले याची माहिती पोलिसांनी घेतली.

सौरभ पाटीलवर तिसरा खुनाचा गुन्हा...

संशयित सौरभ पाटील याच्याविरोधात इचलकरंजी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. इस्लामपुरात वर्चस्ववादातून पक्या पुजारी याचा खून झाला होता. त्या प्रकरणात सौरभ याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो जामिनावर बाहेर होता. आता गौरव कुलकर्णी याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे, असे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news