Jayant Patil : टेबलावर वजन ठेवल्याशिवाय महसूल विभागाची कामेच होत नाहीत

अडवणूक, वसुलीबद्दल लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली नाराजी : पारदर्शी कारभार करा अन्यथा अडचणीत याल : जयंत पाटलांनी सुनावले
Jayant Patil
Jayant Patil
Published on
Updated on

ईश्वरपूर : येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात लोकप्रतिनिधींनी महसूलसह सर्वच शासकीय विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. महसूल विभागात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय जनतेची कामेच होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पारदर्शी कारभार करा, अन्यथा अडचणीत याल, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्यासह कर्मचाऱ्यांना दिला. सर्वच शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी केली.

शासनाच्यावतीने येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान आयोजिले होते. त्यासाठी आ. जयंत पाटील, आ. सदाभाऊ यांच्यासह तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील व त्यांचे तालुक्यातील सर्व कट्टर विरोधक अनेक दिवसांनंतर एकाच मंचावर आले होते.

आ. जयंत पाटील यांनी, महसूल विभाग विशेष करून तहसील कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले, महसूल विभागात सामान्य लोकांची जास्त कामे असतात आणि येथेच लोकांना जास्त त्रास होतो. येथील प्रांताधिकारी व तहसीलदार पारदर्शक कारभार करणारा असावा, असा माझा नेहमी आग्रह असतो. मात्र अलीकडे तसे होताना दिसत नाही. तहसील कार्यालयात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामेच होत नाहीत. असा तहसील कार्यालयाचा लौकिक झाला आहे. हा माझा तालुका आहे. येथील कारभार पारदर्शक व्हावा, ही माझी भूमिका असते. जर तालुक्याला गृहीत धरून कोणी काम करीत असेल तर त्यांनी सुधारणा करावी. हा सुजाण लोकांचा तालुका आहे. तो भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. मला खात्री आहे संबंधित बोध घेऊन पारदर्शक कारभार करतील. याच कार्यक्रमात माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, शिवसेनेचे गौरव नायकवडी यांनीही शासकीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

आ. सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांनी शासनाच्या योजना सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या.

जि. प. च्या अध्यक्षा संगीता पाटील, सभापती उदयसिंह पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव,माजी नगरसेवक वैभव पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, सागर खोत, विजय पवार आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर, मुख्याधिकारी वैभव साबळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार आदी आयोजक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news