

इस्लामपूर : येथील दत्त टेकडी परिसरातील घराचे कुलूप फोडून लोखंडी कपाटातील सव्वासहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 2 हजार रुपयांची रोकड, असा सुमारे 3 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी राहुल भास्कर कांबळे (इस्लामपूर, मूळ रा. करंजवडे, ता. शिराळा) यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली.
राहुल हे कुटुंबासह दत्तटेकडी परिसरात भाड्याच्या घरात राहतात. सोमवारी रात्री ते व त्यांचे कुटुंबीय जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्री त्यांच्या आईची तब्येत बिघडल्याने तळघराला कुलूप लावून वरील मजल्यावर आईजवळ गेले. मंगळवारी सकाळी पूनम खाली आल्या असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा होता. कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. ड्रॉव्हर उघडलेले होते. ड्रॉव्हरमधील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, 60 हजार रुपयांचा 1 तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याचा 90 हजार रुपयांचा नेकलेस, 54 हजार रुपये किमतीच्या 9 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 48 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅमची दोन कर्णफुले, 2 हजार रुपयांची रोकड, असा 3 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.
गुन्हे अन्वेषणचे पथक तळ ठोकून..
पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाला बोलावण्यात आले. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे पथकासह दाखल झाले. गुन्हे अन्वेषणचे पथक परिसरात तळ ठोकून आहे.