इस्लामपूर पुढारी वृत्तसेवा : वाघवाडी फाटा ते इस्लामपूर मार्गावर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट (वय 13, रा. अभियंतानगर, पेठ, ता. वाळवा) या शाळकरी मुलाच्या डोक्यावरून जेसीबीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा घातपात की अपघात, अशी चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.
सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास करून संशयित जेसीबी चालक जयमंगल बैजनाथसिंह (वय 28, मूळ रा. हिम्मतपूर, बिहार, सध्या रा. वाघवाडी फाटा) याला अटक केली. गुन्ह्यातील जेसीबी मशिनही जप्त केले. सिंह याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अभियंतानगरात कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत हर्षवर्धन व त्याचे कुटुंब दगड घडवून तुळस, जाती, खलबत्ते, वरवंटा तयार करण्याचे काम करतात. तेथेच शेडमध्ये राहतात.
मंगळवारी रात्री शेडनजीकच्या रस्त्यावर हर्षवर्धन व त्याचे दोन नातेवाईक झोपले होते. बुधवारी सकाळी हर्षवर्धन याचा मृत्यू झाल्याचे दिसले. मात्र त्याच्या बाजूला झोपलेले सुरक्षित होते. हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरू होती. सांगलीतून श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक मागविण्यात आले.
गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी.व्ही. ढेरे, सहायक पोलिस फौजदार मारूती साळुंखे यांनी घटनास्थळाची पहाणी केली. त्यावेळी हर्षवर्धन याच्या अंथरूणाजवळ माती पडल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तेथे काम सुरू असलेल्या जेसीबी चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी जयमंगल सिंह याने हर्षवर्धन याच्या डोक्यावरून जेसीबीचे चाक गेल्याची कबुली दिली.