

इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यावर शेतकरी उद्यानाजवळ दुचाकी पादचार्यास धडकल्याने दुचाकीवरून निघालेला आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आविष्कार गोकुळ गायकवाड (वय 24, मूळ रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी (दि. 5) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला.
आविष्कार गायकवाड हा इस्लामपूर येथील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. तो खोली घेऊन राहत होता. रविवारी रात्री तो मित्राला सोडून दुचाकीवरून (एमएच 16 सीएल 5659) इस्लामपूरकडे येत होता.
शेतकरी उद्यानाजवळील वळणावर आविष्कारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने रस्त्याकडेने चालत निघालेल्या आदम ईश्वरा कांबळे (वय 56, रा. रमाईनगर, इस्लामपूर) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात आदम कांबळे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यांच्या पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली, तर दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या आविष्कारच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर मार लागला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आविष्कारच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, जखमी कांबळे यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातांची मालिकाच; चार महिन्यांत सहा बळी!
प्रशासकीय इमारत ते शेतकरी उद्यान या अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये सहाजणांना प्राण गमावावे लागले आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी असलेले दुभाजक, बंद सिग्नल व्यवस्था, सुसाट वेगाने धावणारी वाहने आणि रस्त्यांवर लावलेली वाहने, यामुळे सातत्याने अपघात घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.