

इस्लामपूर ः संपूर्ण देशातील एक आदर्श महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इस्लामपूर शहरात पुतळा उभारणार असल्याची घोषणा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केली.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा. डॉ. मानसिंग ठोंबरे यांचे ‘कर्मयोगिनी अहिल्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, प्रा. शामराव पाटील, विजयराव यादव, आनंदराव मलगुंडे, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुणादेवी पाटील, सुस्मिता जाधव, प्रा. सुकुमार कांबळे, विवेक कोकरे उपस्थित होते. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, तालुका अध्यक्षा सुनीता देशमाने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आ. पाटील म्हणाले, अहिल्यादेवींनी राज्यकर्ता कसा असावा याचा परिपाठ देशाला घालून दिला आहे. त्यांनी स्वखर्चातून संपूर्ण देशात विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. धार्मिकस्थळी राहणे व अन्नदानाची व्यवस्था केली. त्यांनी राज्यावर चाल करून येऊ पाहणार्या राघोबा पेशव्यांना पाठविलेला खलिता त्यांच्या धैर्याचे प्रतीक आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा पुतळा राजारामबापू बँकेच्या माध्यमातून आपल्या शहरात उभा करीत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा आपल्या शहरात उभा करू. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती करून या कामास गती देऊ.
प्रा. डॉ. मानसिंग ठोंबरे म्हणाले, अहिल्यादेवी या रणरागिणी होत्या. त्यांनी अब्दालीसारख्या शत्रूला सामोरे जात रजपूत व जाटांवर मात केली. त्यांनी 18 व्या शतकात विधवेला संपत्तीमध्ये हक्क, 300 महिलांची पलटण, शेतकर्यांना पतपेढीमार्फत बी-बियाणे, दरोडेखोरीत असलेल्या पारध्यांवर वचक बसविताना त्यांच्या हाताला काम, जनतेची लूट करणार्या भिल्लांच्या मुलांबरोबर आपल्या मुलीचे लग्न आदी क्रांतिकारी कार्य केले आहे. अहिल्यादेवींना जनता आई मानते, इतके उत्तम त्यांचे प्रशासन व न्याय व्यवस्था होती.विनायक पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, धनंजय कुलकर्णी, माणिक पाटील, शशिकांत पाटील, सुभाष सूर्यवंशी, संभाजी कचरे, अविनाश खरात, अनिल खरात, सुनील मलगुंडे, बाबुराव हुबाले, किसन गावडे उपस्थित होते.