

ईश्वरपूर : पालिका निवडणुकीचा रणसंग्राम आज, सोमवारपासून सुरू होत आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ईश्वरपूर नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी ही लढत अपेक्षित आहे.
पालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पालिकेच्या सभागृहात निवडणूक कक्ष करण्यात आला आहे. येथे सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दिनांक 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
डांगे - मलगुंडे लढत...
या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव मलगुंडे व आघाडीचे विश्वनाथ डांगे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत विकास आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले होते, तर 28 नगरसेवकांपैकी आघाडीचे 13, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 14, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे नगराध्यक्ष आघाडीचा, तर बहुमत राष्ट्रवादीचे असे सभागृहातील चित्र होते.
या निवडणुकीत शहरातील 14 प्रभागाचे 15 प्रभाग व 28 सदस्यांचे 30 सदस्य झाले आहेत. या 30 जागांपैकी सर्वसाधारण गटासाठी 9, सर्वसाधारण महिला गटासाठी 9, नागरिकांचा मागास प्रवर्ग 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 4, अनुसूचित जाती 2, अनुसूचित महिला 2 असे आरक्षण आहे, तर मतदार संख्या 64 हजार 215 एवढी आहे. त्यामध्ये पुरुष मतदार 31 हजार 871, तर स्त्री मतदार 32 हजार 340 एवढे आहेत. तसेच प्रथमच 4 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
पावणेदोनशे वर्षांचा इतिहास...
ईश्वरपूर नगरपरिषदेला 172 वर्षांचा इतिहास आहे. नगरपालिकेची स्थापना 18 नोव्हेंबर 1853 साली झाली. मात्र पालिकेच्या नोंदीत 1909 पासून नगराध्यक्षांची कारकीर्द आहे. शहराच्या नामांतरानंतरची ही पहिलीच निवडणूक होत आहे.