Sangli News : प्रखर विरोधानंतर पाणीपट्टी दरवाढीचा विषय रद्द

धार्मिक स्थळाजवळ मांस विक्रीला बंदी; भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा ठराव
Sangli News : प्रखर विरोधानंतर पाणीपट्टी दरवाढीचा विषय रद्द
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी वाढीला विरोधी नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे दरवाढीचा विषय रद्द करण्यात आला. शहरातील धार्मिक स्थळापासून ५० मीटरवर मांस विक्रीला बंदी घालण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. गुंठेवारीत सुधारणा करणे, विकासकामांना मुदतवाढ, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आदी चाळीस विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वीस हजार पाचशे रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा यावेळी नगराध्यक्षांनी केली.

नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक पूनर्मूल्यांकन करणे व पाणीपट्टी दारामध्ये सुधारणा करण्याच्या विषयाला विरोधी नगरसेवक आनंदराव पवार, अमित ओसवाल, अजित पाटील, राजवर्धन पाटील, सतेज पाटील यांनी विरोध केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी वाढ करू नका, अशी त्यांनी मागणी केली. यावर मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी शासनाचा आदेश पाळणे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे हा विषय विषय पत्रिकेवर घेतल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, नगरसेवक संग्रामसिंह पाटील यांनी शासनाचे नियम पालिकेने पाळले नाहीत, तर निधी मिळण्यास अडचण येते असे सांगितले. शेवटी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी दुष्काळामुळे पाणीपट्टीचा विषय रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

शहरातील मटण, मासे विक्री करणाऱ्या दुकानदारांना नियमावली घालून देण्याची मागणी नगरसेविका अनिता ओसवाल, अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, स्वरूप मोरे यांनी केली. यावर मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी धार्मिक स्थळापासून ५० मीटरवर मांस विक्रीला बंदी, तसेच दुकानदारांना नियमावली घालून दिली जाणार असल्याचे सांगितले. प्रा. अरुणादेवी पाटील, सुप्रिया पाटील, डॉ. संग्राम पाटील, सुभाष सूर्यवंशी, एल. एन. शहा, संग्रामसिंह पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. शासकीय योजनांची अंमलबजावणी, दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा, थकीत कर वसुली, क्रीडा सुविधा, व्यायामशाळा व मैदानांचा विकास आधी ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.