

ईश्वरपूर : थकीत वीज बिलापोटी तालुक्यातील पाणी योजना, आरोग्य केंद्र-उपकेंद्राचा विद्युतपुरवठा खंडित करू नये, अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या सभेत देण्यात आल्या.
येथील वाळवा पंचायत समितीच्या सभागृहात पहिली सभा झाली. सभापती उदयसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते. उपसभापती प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विभागाचा आढावा घेताना कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी विविध योजनांची माहिती दिली. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. कृषी सहायक फक्तग्रामसभेलाच उपस्थित राहतात, चांगल्या पिकांचा फोटो काढण्यासाठीच शेताच्या बांधावर येतात, असा आरोप सदस्यांनी केला. पंचायत समितीच्या सभागृहात या कृषी सहायकांची बैठक लावावी, अशा सूचना सभापती पाटील यांनी दिल्या.
बिबट्याच्या दहशतीमुळे तालुक्यातील सर्व कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी शुभम पाटील, प्रदीप पाटील यांनी केली. महापुरात वारणा पट्ट्यातील शिगावसह अन्य गावात पोल उखडून पडले होते, ते दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण विभागाचा आढावा घेत गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी यांनी, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले असल्याचे स्पष्ट केले. 400 शाळांनी मूल्यांकन करावे, यामुळे त्यांची श्रेणी ठरवली जाणार आहे. बैठकीस गटनेते प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, पुष्कराज पाटील, मनोज पाटील, समर्थ पाटील, वृषाली पाटील, सुप्रिया पाटील आदी उपस्थित होते.