

ईश्वरपूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी ईश्वरपूर शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी इस्लामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उरुण-ईश्वरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील तसेच शहरातील सर्व समविचारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत संताप व्यक्त केला. शहरातील व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला.
गांधी चौकात सर्व व्यापारी एकत्र आले आणि या घटनेचा निषेध केला. बंदमुळे शहरातील बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या. गांधी चौक, यल्लमा चौक, बस स्टँड रोडसह प्रमुख चौक आणि रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. बंदमुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी, अत्याचाराविरोधातील लढा अधिक महत्त्वाचा आहे, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली. हा बंद म्हणजे केवळ बाजारपेठ बंद ठेवण्याचा कार्यक्रम नसून, व्यवस्थेच्या अपयशाविरोधात उसळलेला जनतेचा संताप असल्याचे चित्र शहरभर दिसून आले.
यावेळी संशयित आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. अशा गंभीर प्रकरणांमध्ये दिरंगाई, आणि बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत पोलिस प्रशासनाला धारेवर धरले गेले. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, अशी तीव्र भावना आंदोलकांच्या भाषणांतून व्यक्त झाली.
शहरात खुलेआम सुरू असलेले नशिले अड्डे, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्ती तत्काळ उद्ध्वस्त करा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. केवळ कागदी कारवाई न करता पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष मोहन पाटील यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार केला. माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, दीपक कोठावळे, विजय महाडिक आणि विजय कारंजकर यांनीही आक्रमक भाषण करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. महिलांची व मुलींची सुरक्षितता ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे, असा संदेश या बंदमधून देण्यात आला. हा बंद म्हणजे समाजाच्या संयमाचा शेवट असून, आता न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार व्यापारी व नागरिकांनी केला. यावेळी शहरातील सर्व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.