

ईश्वरपूर: अत्यंत चुरशीने झालेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणूकित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी महायुतीला धोबीपछाड देत पालिकेवर पुन्हा एक हाती सत्ता मिळवली. पालिकेत सत्तांतर झाले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी भाजपाचे विश्वनाथ डांगे यांचा 7388 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पद मिळवले आहे. राष्ट्रवादीला 22 तर महायुतीला फक्त 8 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला 3, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 व शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष व भाजपचे नेते विक्रम पाटील, उपाध्यक्ष वैभव पवार, माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील या नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर प्रमुख विजयी उमेदवारांच्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी नगराध्यक्ष प्रा अरुणादेवी पाटील, सुभाष सूर्यवंशी, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, शुभांगी शेळके, सविता पाटील, सुप्रिया पाटील आदींचा समावेश आहे. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात एकच जल्लोष केला. नव्या सुभागृहात 19 नवे चेहरे येणार आहेत. विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, विक्रम पाटील, वैभव पवार, शकील सय्यद, कोमल बनसोडे हे जुन्या सभागृहातील नगरसेवक पराभूत झाले आहेत.
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचे धाकटे बंधू सुनील मलगुंडे हे प्रभाग 13 मधून विजयी झाले आहेत. त्यामुळे सभागृहात दोन भाऊ असणार आहेत.
- प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांचा त्यांचे चुलत पुतणे राजवर्धन पाटील यांनी पराभव केला आहे.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा फारसा कोणाला फटका बसला नाही. प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर उमेदवार स्मिता थोरात यांनी तब्बल साडेचारशे मते घेतली. तरीही येथे याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार सविता पाटील या 840 मतांनी विजयी
- प्रभाग दोन मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार लता कुर्लेकर, डॉक्टर संग्राम पाटील, तर प्रभाग चार मधील महायुतीचे उमेदवार अजित पाटील, विद्या पवार हे उमेदवार हजार मताहून अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. तर प्रभाग एक मध्ये शिवसेनेचे सचिन कोळेकर हे केवळ 24 मतांनी विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत आनंदराव मलगुंडे यांना 26731 तर महायुतीचे विश्वनाथ डांगे यांना 19343एवढी मते मिळाली. 15 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 6, व प्रभाग क्रमांक 8 मध्येच महायुतीचे डांगे यांना मताधिक्य आहे. ज्या प्रभागात युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत तेथेही डांगे यांना विजयी उमेदवारांच्या पेक्षा कमी मते मिळाली आहेत. उरूण परिसरात आनंदराव मलगुंडे यांना तुलनेने ज्यादा मताधिक्य आहे.