

मारुती पाटील
ईश्वरपूर : उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी तीन पैकी केवळ दोनच निवडी जाहीर करून सत्ताधारी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने पहिल्याच सभेत विरोधी महायुतीला धक्का दिला आहे. या निर्णयामुळे तिसऱ्या नगरसेवक पदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेमुळे ही निवड पुढे ढकलण्यात आल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे तिसरा स्वीकृत नगरसेवक कोण होणार याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
शुक्रवारी पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदांची व उपनगराध्यक्ष पदाची निवड पार पडली. पालिकेतील संख्याबळानुसार सत्ताधारी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन स्वीकृत नगरसेवक झाले. विरोधी महायुतीचा एक नगरसेवक होणार होता. मात्र विरोधकांचे सभागृहात दोन वेगवेगळे गट स्थापन झाल्याचे कारण पुढे करत कायदेशीर सल्ला घेऊन तिसरा नगरसेवक निवडला जाईल, असे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी जाहीर करून सभा तहकूब केली. यामुळे विरोधकांची चांगलीच गोची झाली आहे. आता महायुतीचे अमित ओसवाल व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे विजय देसाई यांचे स्वीकृतसाठी अर्ज राहिले आहेत. निवडणूक झाल्यानंतर महायुतीमध्ये नगरसेवक पदावरून रस्सीखेच सुरू आहे. अमित ओसवाल यांना अंतर्गत विरोध आहे. त्यातच पालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. तसेच स्वीकृतसाठी माजी नगरसेविका मनीषा पाटील यांचाही अर्ज भरण्यात आला होता. मात्र त्यांनी नंतर आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीकडून आता ओसवाल यांचाच अर्ज राहिला आहे. त्यामुळे तेच स्वीकृतसाठी दावेदार ठरत आहेत. तरीही त्यांची निवड करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकत्रीकरणाची चर्चा...
सध्या राज्यात दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे. ईश्वरपूर पालिकेतही दोन पक्ष एकत्रित आले, तर तिसरा स्वीकृत नगरसेवकही आपलाच होईल, अशी आशा सत्ताधारी राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपल्यासोबत घेण्याबाबत प्राथमिक बैठक झाल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनीही वरिष्ठ स्तरावरूनच पक्ष एकत्रीकरणाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले, तर अजित पवार गटाचे पालिकेतील गटनेते सतेज पाटील यांनी मात्र या चर्चेत काही तथ्य नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात ते पाहावे लागेल.