

ईश्वरपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात महिलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, या उद्देशाने दैनिक पुढारी कस्तुरी क्लब, ईश्वरपूर यांच्या वतीने आयोजित गरबा-दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विजय संस्कृती भवन येथे पार पडलेल्या या उत्सवात शेकडो महिलांनी पारंपरिक गरबा व दांडियाच्या तालावर ठेका धरत आनंद लुटला. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदार पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. ‘वेदिका वन ग्राम’चे भरत पाटील यांच्या वतीने सहभागी महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘स्किल अकॅडमी’चे सुनील चव्हाण, सागर कांबळे आणि प्रिया चव्हाण यांचेही सहकार्य लाभले.
उत्सवादरम्यान महिलांसाठी बेस्ट एनर्जी, बेस्ट ड्रेपरी, बेस्ट कपल आणि बेस्ट ग्रुप डान्स अशा विविध मनोरंजक आणि चुरशीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेस्ट एनर्जीचा पुरस्कार काव्या घुगे यांनी, बेस्ट ड्रेपरीचा पुरस्कार शर्वरी शहा यांनी, तर बेस्ट कपलचा पुरस्कार अर्चना परीट आणि त्यांची कन्या तनिष्का परीट यांनी पटकावला. बेस्ट ग्रुपचा बहुमान स्किल अकॅडमी ग्रुपने मिळवला. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
विजेत्यांचा गौरव
या वेळी ‘दैनिक पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे आयोजित घरगुती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. घराची आकर्षक सजावट करून आपली कलात्मकता सादर करणाऱ्या महिलांच्या कौशल्याचे उपस्थितांनी कौतुक केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मराठमोळाचे सुरेंद्र पाटील, विजय पाटील व हर्षवर्धन पाटील यांचे सहकार्य लाभले.