

ईश्वरपूर : ऐन पावसाळ्यात वाळवा तालुक्यातील वाड्या - वस्तीवर महावितरणने रात्रीच्यावेळी चार तास भारनियमन सुरू केले आहे. बिबट्यांची दहशत, चोर्यांचे वाढते प्रमाण या पार्श्वभूमीवर भारनियमनामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. लोक महावितरणवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
आठ-दहा दिवसापासून रात्री साडेसात ते साडेअकरा असे चार तास रानातील वीज पूर्ण बंद केली जात आहे. त्यामुळे रानात वस्तीवर राहणार्या लोकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. धरणांतून पाणीसाठाही होत आहे. मग भारनियमन कशासाठी? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारनियमन करायचेच असेल तर ते दिवसा करावे, अशी मागणी लोकांतून होत आहे. तसेच हे भारनियमन फक्त वाड्या - वस्त्यांवरच का? गावात का होत नाही? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. भारनियमनाविरोधात बोरगाव येथे महावितरणच्या कार्यालयात संतप्त लोकांनी हल्ला केला होता. आता ईश्वरपूर येथील कार्यालयावरही मोर्चा काढण्याची तयारी लोक करू लागले आहेत.