

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.
यावेळी पाटील यांच्याकडून त्यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी श्रीमती पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा राजकीय निर्णय होणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीवेळी मदनभाऊ गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर काँग्रेसमधून त्यांचे निलंबन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून राजकीय भूमिका जाहीर करण्याबाबतचा दबावही श्रीमती पाटील यांच्यावर वाढत होता. गेल्या आठवड्यात राजकीय दिशा ठरविण्यासाठी कळंबी (ता. मिरज) येथे मदनभाऊ गटातील निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी भाजपसोबत, तर काहींनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याबाबत मत मांडले. पण अंतिम निर्णय जयश्री पाटील यांच्यावर सोपविण्यात आला होता.
श्रीमती पाटील यांनीही कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही, आठ दिवसांत कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली होती.त्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या निवासस्थानी भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही समजते. दरम्यान, जयश्री पाटील या मंगळवारी अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चेनंतर त्या आपला अंतिम निर्णय देतील, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.