

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे थाटलेला एमडी ड्रग्जचा कारखाना हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीम याच्या हस्तकांकडून चालविला जात असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे डी कंपनीकडून थेट दुबईतून कवठेमहांकाळच्या इरळी येथे माळरानावर थाटलेल्या एमडी ड्रग्जचे सिंडिकेट चालविले जात होते. याप्रकरणी आता दुबईतून या टोळीचा म्होरक्या कुब्बावाला मुस्तफा यास भारतात आणले आहे.
गेल्यावर्षी मुंबईत एकाकडे 641 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर मुंबईतील मीरा रोड येथे छापा टाकून साजीद शेख ऊर्फ डॅब्ज याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडे तीन किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इरळीमध्ये कारखाना थाटला होता. तेथे या एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रँचच्या 7 युनिटचे तत्कालीन निरीक्षक नीरज उबाळे यांनी छापा टाकून कारवाई केली होती. त्यावेळी आठजणांना अटक केली होती. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने तब्बल 245 कोटी रुपयांचा 123 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.
यावेळी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले होते. यावेळी दुबईतून संपूर्ण भारतात ताहेर सलीम डोला आणि कुब्बावाला मुस्तफा हे दोघे संपूर्ण भारतात सिंडिकेट चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोघांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्यानुसार दोघांना भारतात परत आणण्यासाठी सीबीआय आणि मुंबई क्राईम ब्रँचचे प्रयत्न सुरू होते. यासाठी दुबई सरकारसोबत भारत सरकार सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे गेल्या महिन्यात सलीम डोला याला भारतात आणले होते. परंतु कुब्बावाला मुस्तफा हा फरार होता. त्यालाही ताब्यात देण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार दुबईतून त्यालाही आता सीबीआय आणि मुंबई क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे.
सलीम डोला हा भारतात ड्रग्जचे कनेक्शन चालवितो. तो कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीम याचा थेट हस्तक आहे. त्याचे अनेक हस्तक भारतात पसरलेले आहेत. तसेच कुब्बावाला मुस्तफाही सलीम डोला याचा हस्तक आहे. त्यामुळे दाऊद इब्राहीम हा सलीम डोला आणि कुब्बावाला मुस्तफा या दोघांच्या मदतीने भारतात सिंडिकेट चालवित होता. त्या दोघांचे हस्तक मुंबईत होते. त्या हस्तकांमार्फत इरळीमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने आता सांगलीतील इरळी थेट आंतरराष्ट्रीय पटलावर आले आहे.
एरव्ही ज्या भागात चिटपाखरू देखील जाणार नाही, अशा माळरानावर या एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू केला होता. कारवाईमध्ये ज्या व्यक्तींची नावे समोर आली होती, ते कुख्यात ड्रग्ज पेडलर व गुन्हेगार होते. त्यामुळे या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळली होती. आजपर्यंतचा सर्वात मोठा साठा इरळीमधून जप्त करण्यात आला होता.
सांगली यापूर्वीपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. कोणत्या ना कोणत्या कारणातून सांगली हिटलिस्टवर आहेच. पण आता इरळीचे थेट डी गँगशी कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे तर देशभरातील तपास यंत्रणांच्या रडारवर सांगली आले आहे. त्यामुळे डी कंपनीचे अन्य काही साथीदार महाराष्ट्रासह देशभरात पसरले आहेत का? याचा शोध घेण्यात येत आहे.