

सांगली ः पुढारी वृत्तसेवा
देशात एक जुलैपासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. या कायद्यांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने पोलिस मुख्यालयात नव्या भारताचे नवीन कायदे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याहस्ते झाले.
यावेळी अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सुधीर भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फुलारी म्हणाले की, केंद्रीय संचार ब्युरो व सांगली पोलिसांनी नवीन कायद्यांची जनतेला ओळख व्हावी, यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. महिला, मुली, मुलांनी नव्या कायद्यांची माहिती घेणे आवश्यक असून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत व माहिती द्यावी.