

सांगली : महाराष्ट्रासह इतर राज्यांत बॅगा पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेशमधील गुड्डेटी टोळीच्या प्रमुखासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सालमान रामलू गुड्डेटी (वय 56) आणि त्याचा मुलगा संदीप सालमान गुड्डेटी (32, दोघे रा. तिप्पा, ता. बिटरगुन्टा, जि. नेल्लोर, जि. आंध्र प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा, कवठेमहांकाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केले आहेत.
शिराळा (जि. सांगली) येथे दि. 3 डिसेंबर रोजी माणिक रंगराव पाटील यांनी बँकेतून पेन्शनचे 43 हजार रुपये काढले होते. त्यानंतर ते रक्कम एका बॅगेत ठेवून बॅग दुचाकीस अडकवून ते तहसील कार्यालयात स्टॅम्प आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन बाप-लेकाने त्यांची बॅग चोरून पलायन केले होते. याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संजीव झाडे यांनी दिले होते. त्यानुसार सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तपास करीत आहेत.
चौकशीदरम्यान शिराळा येथून बॅग चोरणारा सालमान गुड्डेटी व त्याचा मुलगा संदीप हे दोघे मिरजेतील एका खासगी रुग्णालयाजवळ आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शिराळा येथील चोरीची कबुली दिली. तसेच कवठेमहांकाळ येथेही दुचाकीच्या डिकीतून व कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथून बॅग चोरल्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, सालमान गुड्डेटी हा आंध्रप्रदेशमधील सराईत गुन्हेगार आहे. तो अनेक गुन्ह्यात फरारी होता. त्याच्याकडून सांगली, कोल्हापूर येथील गुन्ह्यांसह गेल्या वर्षी नांदेड, अकोला, लातूर या ठिकाणी झालेल्या 8 गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे.
गुड्डेटी चार राज्यात वॉन्टेड
सालमान गुड्डेटी याने महाराष्ट्रासह छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशमध्ये चोऱ्या केल्या आहेत. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. चारही राज्याचे पोलिस त्याच्या मागावर होते. सध्या शिराळा पोलिसांकडे त्याचा ताबा आहे. लवकरच आंध्रप्रदेशमधील पोलिस सांगलीत येणार असून त्याचा ताबा आंध्रप्रदेश पोलिस घेणार आहेत.
हजारो किलोमीटर दूरवर दुचाकीवरून प्रवास करीत चोरी
सालमान गुड्डेटी हा राहत असणारे आंध्र प्रदेशमधील तिप्पा (बिटरगुन्हा) हे गाव सांगलीपासून एक हजार ते अकराशे किलोमीटर दूरवर आहे. इतका लांबचा प्रवास दुचाकीवरून करून त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथून बॅगा चोरल्या होत्या.