

सांगली : सांगली, मिरज शहर परिसरासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पावसाळा सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या पंधरवड्यात सरासरी 76.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत हा पाऊस 59.1 टक्के इतका आहे. मे आणि जून महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील धरणे सुमारे 40 टक्के भरली आहेत.
सांगली जिल्ह्यात सलग आठ दिवस तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. वाळवा, तासगाव, कडेगाव, मिरज आदी तालुक्यांत पावसाच्या सरी बरसल्या. जत तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली. सांगलीत काल रात्री त्यानंतर दिवसभर तुरळक पावसाच्या सरी पडत राहिल्या. थांबून, थांबून हा पाऊस बरसत राहिला. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. पावसामुळे शामरावनगर, संजयनगर, कोल्हापूर रोड, शंभरफुटी रोड, कलानगर, काकानगर आदी उपनगरांत चिखल साचून राहिला आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढला आहे. त्यामुळे नागरिक जर्किन, रेनकोट, टोपी घालून वावरताना दिसत आहेत.