

आष्टा : माहेरहून 20 तोळे सोने आणि 10 लाख रुपये घेऊन येण्यासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या एका नवविवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना बावची (ता. वाळवा) येथे घडली. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रियंका अनिकेत रेठरेकर (वय 22, मूळ नाव- प्रियांका गणेश बनसोडे, रा. भडकंबे, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनिकेत ज्ञानू रेठरेकर, ज्ञानू रेठरेकर, सुवर्णा ज्ञानू रेठरेकर, सुनील ज्ञानू रेठरेकर आणि सुजाता सुनील रेठरेकर (सर्व रा. बावची, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडकंबे येथील प्रियंका हिने बावची येथील अनिकेत ज्ञानू रेठरेकर याच्याशी आंतरजातीय विवाह केला आहे. 17 जून ते 8 जुलै 2025 या कालावधीत सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिला ‘तुझी आमच्या घरी राहायची लायकी नाही’, असे म्हणून वेळोवेळी जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच, ‘आमच्या घरी नांदायचे असेल तर माहेरहून 20 तोळे सोने आणि 10 लाख रुपये हुंडा घेऊन ये’, असे म्हणून तिचा छळ केला गेला. याशिवाय, पती अनिकेत याने ‘मी तुला नांदवणार नाही’, असे म्हणत तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी भडकंबे येथे सोडून दिले. आष्टा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.