

पलूस : रामानंदनगर (ता. पलूस) येथील रेल्वे हद्दीतून उद्ध्वस्त करण्यात आलेल्या झोपड्यांमुळे उघड्यावर आलेल्या निराधार व बेघर कुटुंबांना हक्काचे घर व पुनर्वसनाची मागणी करत दलित महासंघाच्यावतीने बुधवारी पलूस तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.
8 दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने रामानंदनगर येथील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भटकी, मागासवर्गीय कुटुंबांच्या झोपड्या जेसीबीने जमीनदोस्त केल्या. त्यामुळे ही कुटुंबे सध्या बेघर झाली आहेत.
या अन्यायाविरोधात 12 मे रोजी पीडितांनी पलूसमधील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. त्यावेळी प्रांताधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संपर्क प्रमुख युनूस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनाने झाली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून निळे झेंडे हाती घेत आणि विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.
आंदोलकांनी आपली व्यथा आक्रमकपणे तहसीलदार दीप्ती रिठे यांच्यापुढे मांडली. दुपारी सुरू झालेल्या या आंदोलनात सायंकाळपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत तहसीलदारांशी दोन वेळा चर्चात्मक बैठक झाली, मात्र तात्पुरत्या निवार्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. महाराष्ट्र राज्याध्यक्ष टिपू पटवेगार, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, राज्याध्यक्षा वनिता कांबळे, बापूसाहेब बडेकर, भाग्यश्री सूर्यवंशी, कुलदीप वारे, अर्जुन मोहिते, निशांत आवळेकर, रामा वारे, पिलू वारे, रोहित मोरे, दत्ता जगधने, अनुराधा जगधने, विनूभाऊ कांबळे, अमन इनामदार, राहुल साठे, शिरूभय्या चाऊस, हरीश वडार, अल्ताफ चाऊस, जुनेद चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.