

मिरज : येथील शासकीय रुग्णालयातून (सिव्हिल) तीन दिवसांचे नवजात अर्भक शनिवारी पळविल्याप्रकरणी पोलिसांना स्पष्ट धागेद्वारे मिळालेले नाहीत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी अंकली, मिरज आणि कर्नाटकातील निपाणी येथे छापेमारी करत पाच संशयित महिलांकडे चौकशी केली; परंतु त्या महिलांचा यामध्ये सहभाग नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अर्भकाच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार आणि महात्मा गांधी चौक पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी शनिवारी रात्रभर अंकली, मिरज आणि कर्नाटकातील निपाणीमध्ये छापेमारी केली. पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदीही केली होती. सीसीटीव्ही कॅमेर्याच्या आधारे संबंधित महिलेचा अंकली फाट्यापर्यंत माग काढण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले; परंतु ती महिला तेथून पुढे कोठे गेली, याचा सुगावा मात्र लागलेला नाही.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आहे. अर्भक चोरणारी महिला सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता पोलिसांना वाटते. तिने अर्भक पळवून नेताना अत्यंत शिताफीने हे कृत्य केल्याचे सूत्रे सांगतात. कारण रुग्णालयातून अर्भक बाहेर आणून अंकली फाट्यापर्यंत जाईपर्यंत संबंधित महिलेने कोणाशीही फोनवर संपर्क साधलेला नाही. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मोबाईल लोकेशनमध्ये संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक मिळालेला नाही. त्यामुळे आता तांत्रिक तपासाच्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
रुग्णालयातून अर्भक पळवून नेलेल्या महिलेने अंकलीमध्ये रिक्षातून उतरल्यानंतर या ठिकाणी असणार्या एका मेडिकलमधून अर्भकासाठी दूध पावडर आणि दुधाची बाटली घेतली आहे. या मेडिकल चालकाकडेही पोलिसांनी चौकशी केली. यावेळी तिने साहित्य खरेदीसाठी रोख रकमेचा वापर केल्याचे तपासात समोर आले.
रुग्णालयातून अर्भक पळवून नेल्याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करीत आहे. या समितीकडून रुग्णालयातील प्रत्येक विभागाच्या कर्मचार्यांच्या बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत.
या प्रकरणाची वैद्यकीय तंत्रशिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. नियुक्त केलेल्या चौकशी समितीला तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाईल, असे वैद्यकीय तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.