

सांगली : जगभरात बेदाण्याला मागणी वाढत आहे. भारतासाठी विशेषतः महाराष्ट्रातील सांगली, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांसाठी ही मोठी संधी आहे. मात्र निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण बेदाणा उत्पादनाचा अभाव असल्यामुळे बेदाणा उद्योग क्षेत्रात भारत इतर देशांच्या तुलनेत पाठीमागे पडत आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशातून सुद्धा बेदाण्याची युरोपसह अनेक देशात निर्यात वाढत आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या या उद्योगक्षेत्राकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे ही स्थिती झाल्याचा आरोप शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, हे चित्र बदलण्यासाठी व द्राक्षे, बेदाणा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुढाकार घेणार आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये ड्रायफ्रूटला मागणी वाढत आहे. त्यामध्ये विशेषत: बेदाण्याचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. देशात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात विशेषत: सांगली, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांत होते. यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. मात्र काळानुरूप या उद्योगात अपेक्षित बदल होत नाहीत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये नुकतीच जागतिक बेदाणा परिषद झाली. या परिषदेला राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या परिषदेमध्ये जगाच्या तुलनेत भारत द्राक्ष आणि बेदाणा याबाबतीत कुठे आहे हे लक्षात आले. दक्षिण आफ्रिका हा मागास देश मानला जातो. मात्र या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी द्राक्षाची आधुनिक पद्धतीची होणारी सेंद्रिय शेती आढळून आली. त्यामुळे त्या ठिकाणचा बेदाणा हा युरोपीय देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. तसेच सरकारचे पाठबळ असल्यामुळे द्राक्ष शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तेथील हवामानाला अनुकूल द्राक्षाचे वाण विकसित करण्यात आले आहेत. दर एकरी उत्पादन त्या ठिकाणी जास्त आहे.
याउलट महाराष्ट्रात स्थिती आहे. द्राक्षासाठी बदलत्या हवामानामुळे प्रतिकूल स्थिती वाढत आहे. पिकासाठी औषध फवारण्या सातत्याने कराव्या लागत आहेत. उत्पादन खर्च वाढत आहे. द्राक्षे व बेदाण्याला अपेक्षित दर मिळत नाही. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या, हजारोंना रोजगार मिळवून देणाऱ्या आणि कोट्यवधीचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
बेदाणा उत्पादन आणि निर्यातीच्या जागतिक बाजारपेठेत दक्षिण आफ्रिकेने मोठी आघाडी घेतली असून, भारताची बाजारपेठ अजूनही अपेक्षित वेगाने प्रगती करू शकलेली नाही. जागतिक स्तरावर भारत बेदाणा उत्पादनात पहिल्या पाच देशांमध्ये असला तरी, निर्यातीच्या बाबतीत मात्र तो बराच मागे आहे. याउलट, दक्षिण आफ्रिकेचे स्थान आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेदाणा उत्पादनापैकी 90 टक्केहून अधिक उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी निश्चित केले जाते. हवामान बदल, भौगोलिक धोक्यांमुळे आंतरराष्ट्रीय ग्राहक पुरवठादारांमध्ये विविधता शोधत आहेत. दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट गुणवत्ता, अन्न सुरक्षा आणि सर्वोत्तम उत्पादन पद्धतींवर लक्ष केंद्रित करून या संधीचा फायदा घेतला आहे.
भारत दरवर्षी सुमारे 55,000 ते 65,000 टन बेदाणा उत्पादन करतो आणि जागतिक उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. महाराष्ट्राचा वाटा यात सर्वाधिक, म्हणजे सुमारे 75 टक्के आहे. उत्पादनात आघाडीवर असूनही, जागतिक निर्यातीत भारताचा वाटा केवळ 3 टक्क्यांपर्यंत आहे. भारतीय बेदाण्याला देशांतर्गत बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे निर्यातदार आंतरराष्ट्रीय बाजारात फारसे उत्सुक नसतात. सरकारकडूनही या उद्योगाला वाढण्यासाठी फारशी चालना मिळत नाही.
दरम्यान, ही स्थिती बदलण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात येणाऱ्या द्राक्ष शेतीची, आधुनिक तंत्रज्ञानाची, त्या ठिकाणी असलेल्या वाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.