

Indrayani vs Ambemohar Rice Price
मृणाल वष्ट
सांगली : वासाचा, चवीचा आणि पचायला हलका तांदूळ आपल्या सार्यांची पसंती. यामध्ये तांदळाच्या मोजक्याच जाती येतात. त्यामध्ये आंबेमोहर आणि इंद्रायणीचा नंबर पहिला. आंबेमोहरने दुपटीचा भाव खाल्ला. त्यामुळे बहुतेक ग्राहकांनी इंद्रायणी आणि बासमतीशी गट्टी केलेली दिसते. आंबेमोहर 120 रुपये किलो, तर इंद्रायणी 70 रुपये किलो आहे.
भाताशिवाय जेवणाला पूर्णत्व येत नाही. लग्नकार्याचे मुहूर्त तांदूळ खरेदीपासून केले जातात. त्यामुळे दिवाळीनंतर तांदळाची बाजारपेठ खर्याअर्थाने सज्ज होते. सार्यांसाठी तांदूळ हे मुख्य धान्य. त्यामुळे त्याचा वापर अधिक होतो. सामान्य ग्राहक देखील पोत्याने तांदूळ खरेदी करतो. मात्र सध्या तांदळाच्या दराने शंभरी गाठली आहे. तरीही तांदळाची वर्षभराची तरतूद करण्यासाठी सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच ग्राहक धडपडतात. जिल्ह्यात सप्ताहात 50 टन तांदळाची आवक होते. नेहमीसाठी इंद्रायणी, कोलम, एचएमटी, बासमती तुकडा खरेदी केला जातो.
सांगली मार्केट यार्डात सप्ताहात कोल्हापूर राईस मिल, बालाघाट, मध्य प्रदेशातून तांदळाची आवक होते, अशी माहिती तांदळाचे होलसेल व्यापारी बाळासोा पाटील यांनी दिली. गतवर्षापेक्षा यंदा तांदूळ दरात किलोमागे 5 ते 10 रुपये वाढ झाली आहे. आंबेमोहर तांदळाचा दर मात्र 40 रुपयांनी वाढला. आता सामान्य ग्राहकही कमी दराचा तांदूळ खरेदी करत नाहीत. रेशनवर मिळणारा तांदूळ साधा असल्याने तो इतर कारणासाठी वापरून भातासाठी मात्र 60 रुपयांपासून पुढचा तांदूळ खरेदी केला जातो. रेशनचा तांदूळ इडली, रवापिठी, पिठी, भाजणी, कण्या करण्यासाठी वापरला जातो. खाण्यासाठी एचएमटी, इंद्रायणी आणि कोलमची निवड होते. हॉटेल, खानावळींमध्ये कोलम आणि बासमती तांदूळ वापरला जातो. सांगलीत कर्नाटकातून येणार्या सोना मसुरी, घनसाळ, इंद्रायणी तांदळाला मागणी वाढत आहे.
चार वर्षांपूर्वी 35 ते 38 रुपये किलो असणार्या तांदळाचा आजचा दर 60 रुपये झाला आहे. साधा तांदूळ 35 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत मिळतो. बासमती तांदूळ आवक दिल्लीहून होते. तो कमीत कमी 100 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत मिळतो. सर्वच तांदूळ प्रकारात आणखी तीन प्रकार मिळतात. म्हणजे इंद्रायणीमध्ये लहान, मोठा, मध्यम, बासमतीमध्ये तुकडा एक, तुकडा दोन, अखंड असे प्रकार आहेत. त्यानुसार त्यांचे दर कमी-जास्त आहेत. तो 26 ते 30 किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतो. नवा तांदूळ असेल, तर दर थोडा कमी असतो. जितका जुना तांदूळ, तितका तो शिजायला उत्तम, असा समज गृहिणींमध्ये आहे. दिवाळीनंतर नवा तांदूळ येतो.
सांगली बाजारपेठ फळे, फुले, हळद, गूळ आणि तांदळासाठीही प्रसिध्द आहे. मार्केट यार्डात तांदळाची होलसेल व्यापारी दुकाने 100 ते 150 आहेत. आठवड्यातून एकदा तांदळाची आवक होते. मागणी केल्यानंतर दोन दिवसात गाड्या सांगलीत दाखल होतात. येथून तांदळाची खरेदी करायला जिल्ह्यातील किरकोळ विक्री करणार्या व्यापार्यांबरोबरच कर्नाटकातील व्यापारीही दाखल होतात. त्यामुळे तांदळाची उलाढालही मोठी होते.