
तासगाव शहर : येथील महिला तंत्रनिकेतनमधील स्वयंपाकगृहात गॅसची पाईप लिकेज झाल्याने आगीचा भडका उडाला. यावेळी डायनिंग हॉलमध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थिनी घाबरत पळत सुटल्या. घाबरल्यामुळे अनेक विद्यार्थिनीचा रक्तदाब कमी - जास्त झाला. एकाच वेळी डायनिंग हॉलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही विद्यार्थिनी जखमी झाल्या. हा गंभीर प्रकार घडल्यानंतरही महिला तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य संदीप पाटील यांना स्वतःच्या पोटाची चिंता होती. सांगलीत घरी आहे. दोन पोळ्या खातो, आणि तासाभरात महाविद्यालयावर येतो, असे निर्दयीपणाचे उत्तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. त्यामुळे गॅस लिकेज होऊन आगीसारखी गंभीर घटना घडल्यानंतरही प्राचार्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
तासगाव - मणेराजुरी रस्त्यालगत शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात विविध ठिकाणाहून तब्बल बाराशे विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मंगळवारी रात्री या महाविद्यालयाच्या किचनमधील गॅसची पाईप लिकेज झाल्याने आगीचा भडका उडाला. डायनिंग हॉलमध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थिनी भयभीत झाल्या. गॅसचा स्फोट झाला, या समजूतीने या विद्यार्थिनी भितीने सैरावैरा पळू लागल्या.
या सर्व प्रकारात सात ते आठ विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली. गॅसच्या गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. अनेक विद्यार्थिनींना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील काही विद्यार्थिनींना रात्री उशिरा एका खाजगी रुग्णालयातही पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना समजतात तहसीलदार अतुल पाटोळे व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तर आमदार रोहित पाटील यांनीही दवाखान्यात भेट देऊन विद्यार्थिनींच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या उपचाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माजी खासदार संजय पाटील यांनीही संबंधितांशी फोनवरून चर्चा करून विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान घटना घडल्यानंतर तास ते दीड तास हा सगळा गोंधळ सुरू होता. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला यायला तासभर लागेल. आल्यानंतर त्या ठिकाणी रात्री किती वाजेपर्यंत थांबावे लागेल, हे माहीत नाही. त्यामुळे थोडसं जेवण करून, दोन पोळ्या खाऊन येतो, असं धडधडीत निर्दयीपणाचे उत्तर त्यांनी दिले.
तर दुसरीकडे हा प्रकार घडला असताना एक पुरुष शिक्षक व सुरक्षा रक्षक वगळता एकही महिला वसतिगृह प्रमुख नसल्याचे दिसून आले. वसतीगृहात गेल्या वर्षभरापासून अधीक्षक नसल्याचा गंभीर प्रकार यामुळे समोर आला. याशिवाय या महाविद्यालयात अनेक अडचणी आहेत. त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही.
तब्बल शंभरहून अधिक मुली उपाशी असताना प्रभारी प्राचार्य जेवून येतो असे सांगत असतात आणि ते जेवण करून दीड तासानंतर तासगावात येतात. त्यांच्या या निर्दयीपणाबद्दल विद्यार्थिनी आणि पालकांमधून बुधवारी संताप व्यक्त करण्यात आला.