सांगली : शहरात ‘झिका’ व्हायरसची एन्ट्री झाली आहे. येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा रक्तजल नमुना ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
‘झिका’ पॉझिटिव्ह आलेल्या या वृद्धाला सुरुवातीला ताप, खोकला अशी लक्षणे जाणवत होती. त्यांच्यावर घरातच डॉक्टरांमार्फत उपचार सुरू होते. डेंग्यू व चिकुनगुनिया चाचणीसाठी त्यांची सहा जुलै रोजी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. ही चाचणी निगेटिव्ह आली; मात्र ताप कमी न आल्याने खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने एन्फ्ल्युएंझा व्हायरस पॅनेल टेस्ट केली. सात जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असा तपासणी अहवाल आला. ताप असल्याने आठ जुलै रोजी फिवर पॅनेल मल्टिप्लेक्स पीसीआर ही चाचणी खासगी लॅबद्वारे करण्यात आली. अशक्तपणामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ जुलै रोजी फिवर पॅनेल मल्टिप्लेक्स पीसीआर टेस्टचा तपासणी अहवाल आला. त्यामध्ये ‘झिका’ व्हायरसचे निदान झाले.