Cancer Treatment : कर्करोग उपचारात इम्युनोथेरपीचा सक्षम पर्याय

डॉ. मकरंद खोचीकर ः आंतरराष्ट्रीय वैद्यक संघटनांतर्फे नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर
Cancer Treatment
डॉ. मकरंद खोचीकर
Published on
Updated on

सांगली : मूत्राशयाच्या कर्करोगासह एकूणच कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अत्यंत क्रांतिकारी बदल घडत आहेत. आतापर्यंत प्रचलित असलेल्या शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी या पध्दतींना इम्युनोथेरपीच्या माध्यमातून एक प्रभावी पूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वापरून कर्करोग मुळापासून उखडून टाकणाऱ्या या उपचार पद्धतीमुळे रुग्णाचे मूत्राशय वाचवणे आणि त्याचे आयुष्य वाढवणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूत्राशय कर्करोगतज्ज्ञ डॉ. मकरंद खोचीकर यांनी दिली.

डॉ. खोचीकर 2014 पासून जगभरातील उपचार प्रणाली निश्चित करणाऱ्या संस्थांवर कार्यरत आहेत. ते या सर्व घडामोडींशी संबंधित आयबीसीजी, एएससीओ, टीसीसीएन, डब्ल्युबीसीपीसी या संस्थांशी संबंधित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संस्थांच्या सहयोगातून नुकत्याच याबाबतच्या उपचारासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

काय आहे इम्युनोथेरपी?

डॉ. खोचीकर म्हणाले की, कर्करोगाच्या पेशी शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेला चकवा देऊन स्वतःचे संरक्षण करतात. इम्युनोथेरपी हे कवच तोडण्याचे काम करते. यामध्ये इम्यून चेकपॉईंट इनहिबिटर्सचा वापर करून शरीरातील टी-सेल्सना कर्करोगाच्या पेशी ओळखण्यासाठी सक्षम केले जाते. प्रयोगशाळेत तयार केलेली विशेष प्रथिने कर्करोग पेशींना चिकटतात, ज्यामुळे शरीराची नैसर्गिक यंत्रणा या पेशींना सहजपणे नष्ट करू शकते.

डॉ. खोचीकर 2014 पासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पॅनेलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी सांगितले की, मूत्राशयाच्या कर्करोगाबाबत जागतिक संस्थांनी नुकत्याच नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये रुग्णाच्या विशिष्ट चाचण्या करून एक स्कोअर निश्चित केला जातो. या स्कोअरमुळे उपचारांची दिशा आणि व्याप्ती ठरवणे सोपे झाले आहे. आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडासाठीची स्वतंत्र उपचार प्रणाली देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. या नव्या संशोधनामुळे कर्करोग रुग्णांना केवळ दीर्घायुष्यच मिळेल असे नाही, तर त्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यासही मोठी मदत होणार आहे. मूत्राशय वाचवून कर्करोगावर विजय मिळवणे हे आता स्वप्न राहिलेले नाही. सध्या हे उपचार महाग असले तरी, आता येत्या काळात ते नक्की सर्वांसाठी उपलब्ध होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news