

कुपवाड : विनापरवाना लाकूड वाहतूक करणार्या ट्रकवर वनविभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली. यावेळी 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे लिंब जातीचे 340 घनफूट चिरीव लाकूड व ट्रक, असा एकूण 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वनक्षेत्रपाल आर. एस.कांबळे यांनी दिली.
कांबळे म्हणाले, सांगली वनविभागाचे फिरते पथक शनिवार, दि. 21 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिरढोण ते कवठेमहांकाळ रस्त्यावर गस्त घालत होते. अधिकारी व कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते. तपासणीदरम्यान एका ट्रकमध्ये (क्र. केए 27 ए 5591) लिंब जातीचे चिरीव लाकूड आढळून आले. ट्रक चालक मदगोंडा तमान्ना चुग (वय 48, रा. केंपवाड, ता. कागवाड जि. बेळगाव) याच्याकडे लाकूड वाहतुकीचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पथकाने ट्रक ताब्यात घेऊन कुपवाड येथील वनविभागाच्या कार्यालयात आणला. ट्रकमध्ये सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे लिंब जातीचे 340 घनफूट चिरीव लाकूड मिळून आले. ट्रक चालक मदगोंडा चुग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.