

सांगली : जत तालुक्याच्या सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून गोव्याप्रमाणे कॅसिनोसह जुगाराचे अड्डे चालू झालेले आहेत. या जुगार अड्ड्यांवर दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत असून शेकडो जुगाऱ्यांच्या मैफिली जमत आहेत.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाया करून कोल्हापूर जिल्ह्यातील जुगाराचे अड्डे मोडीत काढले होते. त्यामुळे त्या जुगार अड्डा चालकांनी आता आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळविला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील डफळापूर आणि गुंडेवाडी परिसरात या मंडळींनी नव्याने जुगार अड्डे थाटलेले आहेत. या जुगार अड्ड्यांवर कॅसिनोसह रमी, तीनपानी, अंदर-बाहर, चक्री जुगार असे जुगाराचे सगळे प्रकार सुरू आहेत. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, विजापूर आदी जिल्ह्यांतील शेकडो जुगारी लोकांची या अड्ड्यांवर रात्रं-दिवस वर्दळ सुरू असते. या जुगार अड्ड्यांवर दिवसाकाठी किमान तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक खतरनाक आणि नामचीन गुन्हेगारांचाही या ठिकाणी राबता असल्याची चर्चा आहे. या गुन्हेगारांच्या वर्दळीमुळे या भागातील शांतता व सुव्यवस्था कधी ना कधी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
अनेक दिवसांपासून हे जुगार अड्डे सुरू असताना पोलिसांना याची गंधवार्ताही नसणे शक्यच नाही. पण पोलिस यंत्रणेने या जुगाराकडे कानाडोळा केलेला दिसत आहे. या भागातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात या जुगार अड्ड्यांकडे आकर्षित होऊ लागल्यामुळे पोलिसांनी तातडीने हा जुगार बंद करावा, अशी मागणी या भागातून होत आहे.