

जत : जतपूर्व भागात अवैध व्यवसायांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच बळावत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुगार, मटका, अवैध दारू विक्री, गांजा लागवड व तस्करी, तसेच बायोडिझेलसारख्या अवैध इंधन साठ्याचे प्रकार उघडकीस येत असतानाही संबंधित यंत्रणांची कारवाई अपुरी असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच बोर्गी खुर्द येथे सुमारे 21 लाख रुपयांचा अवैध बायोडिझेल साठा आढळून आला. राष्ट्रीय महामार्गालगत गेल्या दीड वर्षांपासून विनापरवाना बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या व्यवसायास परवानगी कोणी दिली, विद्युत कनेक्शन कसे मिळाले, तसेच डिझेलचा पुरवठा कुठून होत होता, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. या प्रकरणामागे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता व्यक्त होत असून सखोल तपासाची नितांत गरज आहे.
यापूर्वी कोंत्येवबोबलाद येथे दोन महिन्यांपूर्वी पोलिस मध्यस्थांकडून हप्ते मागितले जात असल्याच्या आरोपावरून ट्रक चालक व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या घटनेनंतरही ठोस कारवाई न झाल्याने संपूर्ण पूर्व जत भागात अवैध धंद्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.
शेतकऱ्यांची दुभती जनावरे विक्रीस नेणेही जोखमीचे ठरत आहे. ‘गोवंश’च्या नावाखाली काही तथाकथित गोरक्षकांकडून वाहन अडविणे, मारहाण करणे व धमकी देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्व भाग गांजाचे आगर; पोलिसांचे दुर्लक्ष
3 जून 2018 रोजी करजगी येथे 71 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पूर्व भागातील गांजाविरोधी मोहीम थंडावल्याचे चित्र आहे. केवळ जुजबी कारवाई होत असून बालगाव, करेवाडी, कोंत्येवबोबलाद, करजगी, बोर्गी खुर्द, जालीहाळ बुद्रुक, संख, माणिकनाळ, उमदी, गिरगाव या गावांमध्ये अवैध धंदे जोमात सुरू असल्याचा आरोप होत आहे. याशिवाय हुबळीमेड दारू, बनावट दारू, सिंधी, तीन पत्ती जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे पोलिस व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सामाजिक अशांतता वाढली; निर्भया पथक नावालाच
पूर्व भागात मारामारी, अपहरण, फसवणूक,चोरी, वाटमारी यांसह अन्य गुन्हे वाढत आहे. अनेक गुन्ह्यांमागे क्षुल्लक कारणे असून त्याचा विपरीत परिणाम विशेषतः तरुण वर्गावर होत आहे. समाजसंस्कृतीचे विदारक चित्र समोर येत आहे.अल्पवयीन मुलींचे पलायन, नातेसंबंधातील अनैतिक संबंध, बलात्कार, विनयभंग, पोक्सो, कौटुंबिक कलह, तंटे, भावकीतील वाद यासारख्या घटना वाढत आहेत. महाविद्यालयीन रस्ते व शाळा परिसरात उनाड तरुणांचा वावर वाढला आहे. त्यामुळे निर्भया पथकाने शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाऊन जनजागृती करावी, तसेच महिला व तरुणींना निर्भयपणे व मुक्तपणे वावर करता यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.