Illegal Dog Breeding | हिंस्र श्वानांचे विनापरवाना प्रजनन

प्रजनन केंद्रांची ‘पशुसंवर्धन’कडे नोंदच नाही : संरक्षणासाठी हिंस्र श्वानांना मोठी मागणी
Illegal Dog Breeding | हिंस्र श्वानांचे विनापरवाना प्रजनन
File Photo
Published on
Updated on
स्वप्निल पाटील

Illegal Dog Breeding

सांगली : देशात हिंस्त्र श्वान पाळण्यास बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रजातींच्या श्वानांचे विनापरवाना प्रजनन करण्याचा उद्योग मात्र जोरात सुरू आहे. अशी विनापरवाना प्रजनन केंद्रे देशभरात सर्वत्र सुरू आहेत.

श्वान शौकिनांचा सर्वात आवडता श्वान म्हणजे लॅब्राडोर. तो असतो सर्वात शांत. परिणामी त्याला मागणीही खूप आहे. त्यामुळे त्याचे प्रजननही मोठ्या प्रमाणात केले जाते. परदेशी हिंस्र श्वान पाळणार्‍यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. या हिंस्र श्वानांकडून हल्ल्याच्या घटनाही वाढत आहेत. या श्वानांनी पाळणार्‍या मालकांवरही हल्ले केलेले आहेत. असे असले तरी संरक्षणासाठी या श्वानांची मागणी मात्र कमी नाही, उलट ती वाढतेच आहे. त्यांच्या प्रजननातही वाढ झाली आहे.

बंदी घालण्यात आलेल्यांमध्ये डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड आणि रॉटवायलर या श्वानांचे सर्वत्र प्रजनन केले जाते. हे श्वान काही प्रमाणात हिंस्र असले तरी, संरक्षणासाठी उत्तम मानले जातात. याचे कारण या श्वानांची चांगली आकलन क्षमता. पोलिस खात्यातही डॉबरमॅन आणि जर्मन शेफर्ड सर्रास असतात. त्यामुळे या श्वानांवर तरी बंदी घालू नये, अशी मागणी श्वानप्रेमींतून केली जाते.

परदेशी हिंस्र श्वानांचे प्रजननही देशात केले जाते. विशेषतः उत्तर भारतात या केंद्रांची संख्या मोठी आहे. खरे तर या श्वानांची एका खासगी संस्थेकडे नोंदणी केली जाते. त्याचा खर्चही श्वान पालकांना न परवडणारा आहे. श्वान प्रजनन केंद्र चालविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची परवानगी अनिवार्य आहे. काही मोजकी केंद्रे सोडली, तर कोणीही पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी करीत नाही. पशुसंवर्धन विभागाच्या जाचक अटींमुळे नोंदणी केली जात नसल्याचे श्वानप्रेमींचे म्हणणे आहे. शासनाकडे नोंदणी तर सोडाच, बंदीसाठी प्रयत्न सुरू असलेल्या श्वानांचेही देशभरात सर्रास प्रजनन केले जाते.

केंद्र सरकारने पाळण्यास बंदी घातलेल्या श्वानांची नावे अशी

पिटबुल, रॉटवायलर, डोगो अर्जेंटीनो, फिला ब्रासिलीरा, जपानी टोसा, डॉबरमॅन पिंश्चर, अमेरिकन बुलडॉग, नेपोलिटन मस्टीफ, बुलमस्टीफ, बोअरमस्टिफ, जर्मन शेफर्ड, ब्राझीलीयन रॉटवॉयलर, बँडॉग, टेरीयर, वूल्फ डॉग, अमेरिकन स्टाफर्डशायर टेरीयर, स्टाफर्डशायर बुल टेरीयर, पिनशेर, मास्टिफ, बुलडॉग, बोअरमस्टीफ, बुली, मेक्सिकन मस्टीफ.

श्वानप्रेमींना बंदी नसलेले श्वान पाळण्यास परवानगी आहे. परंतु श्वानप्रेमी प्रजनन केंद्र चालवित असतील तर त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागाकडे प्रजनन केंद्राची नोंदणी असल्यास भविष्यात कोणतीही अडचण श्वानप्रेमींना येत नाही, परंतु काही श्वानप्रेमी नोंदणी करण्यास घाबरतात. शासनाने अटी आणि शर्तींमध्ये सूट द्यावी, जेणेकरून प्रजनन केंद्राची नोंदणी करण्यासाठी प्रत्येकजण पुढे येतील. तसेच केंद्र सरकारने देखील कोणत्याही श्वानावर बंदी घालू नये.
- अजित काशिद, अ‍ॅनिमल सहारा फाऊंडेशन, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news