

सांगली : जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे काम केले आहे, परंतु त्यांचे मन त्या ठिकाणी लागत नसेल आणि त्यांना मार्ग बदलावा वाटत असेल, तर त्यांनी महायुतीमध्ये यावे. मी त्यांना महायुतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांंनी वाळवा येथे सांगितले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी ते एकत्र राहतील का नाही, याची कल्पना नाही, असे सांगून ते म्हणाले, मराठीचा मुद्दा आता संपलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून दादागिरी नको. एखाद्याला मराठी येणार नसेल तर, मराठी बोल नाहीतर तुला मारणार, फटके देणार, अशाप्रकारे वातावरण तयार झाले, तर मुंबईचे आर्थिक वातावरण धोक्यात येईल. मुंबईत बाहेरच्या व्यक्तींना त्रास झाला, तर बाहेरच्या राज्यात मराठी माणसांनाही त्रास होईल.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणाचेही सैराट करू नये आणि वैराटही करू नये. बळजबरीने कोणी धर्मांतर करत असेल तर त्यांना शिक्षा दिली पाहिजे, हे खरे आहे. पण स्वतःच्या मनाने कोणी करत असेल, त्या ठिकाणी दादागिरी होऊ नये. बळजबरीने धर्मांतर करणार्यांविरोधात कायदा आहे, असेही आठवले म्हणाले.