जत; पुढारी वृत्तसेवा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांच्यात जनजागृती करून लोकसहभाग वाढवल्याने कुलाळवाडीत जलसंधारणाची कामे चांगली झाली आहेत. या कामामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. विद्यार्थ्यांनी चांगले श्रमदान केले आहेत. शैक्षणिक गुणवत्ताबरोबर व्यवसायिक कौशल्यादेखील त्यांच्याकडे आहे. जलसंवर्धन व शैक्षणिक गुणवत्ता कौशल्याचा कुलाळवाडी आदर्शवत पॅटर्न इतरत्र राबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
कुलाळवाडी (ता. जत) येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी व जिल्हा परिषद कुलाळवाडी शाळेने राबवलेले विविध उपक्रम याची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक अविनाश पोळ, जिल्हा समन्वयक हिना मुजावर, तुकाराम पाटील, युथ फॉर जत या संस्थेचे सचिव अमित बामणे, प्रमोद साळुंखे, भक्तराज गर्जे, मंडळ अधिकारी संदिप मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले कुलाळवाडी ग्रामस्थचे व शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे जलसंधारणा बरोबर मनसंधारण झाले आहे. समतल चर, वृक्षारोपण ही जलसंधारणाची कामे उत्कृष्ट दर्जाची झाली आहेत. विद्यार्थ्यांनी चांगले श्रमदान केले आहेत. त्यांनी केलेले काम वाखण्यान्यासारखे आहे. उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या संकल्पनेतून शालेय गुणवत्तेत वाढ झाली आहे. फक्त शाळेचा अभ्यासक्रम म्हणजे शिक्षक नव्हे या पद्धतीवर फुली मारत गर्जे यांनी विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखून कौशल्य गुणवत्ताधारक विद्यार्थी सर्वांगीण शिक्षण प्राप्त विद्यार्थी करण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थ्यांच्यात शिक्षकाबद्दल आत्मीयता रुजवली आहे.
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तालुक्यातील झालेल्या जालीहाळ खुर्द, कुलाळवाडी येथील पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. तसेच कुलाळवाडी येथील जलसंधारण शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विविध कौशल्य आधारित उपक्रम राबवित असलेल्या जिल्हा परिषद शाळेने राबवलेले उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. सामाजिक, शैक्षणिक व निसर्ग समृद्धीचा कुलाळवाडी पॅटर्न जाणून घेतला. विद्यार्थ्यांच्या घरी तसेच शेतात भेट देऊन विद्यार्थी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. शाळेद्वारे राबविले जात असलेले विविध उपक्रम जिल्ह्यातील इतर गावांमध्ये देखील राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
कुलाळवाडी जिल्हा परिषद शाळेत अभ्यासक्रमा शिकवण्याबरोबर त्यांच्यातील उपजत गुणांचे अवलोकन करून कौशल्याधारित शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वतः स्वयंपाक करत आहेत. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान दिले जात आहे. जलसंधारणाच्या कामात हिरीरीने भाग घेऊन गावातील विकास कामात सहभाग घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी किमान चार झाडे लावून त्याचे संवर्धन करत आहेत. या उपक्रमाची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेत सुमारे चार तास वेळ रमले होते. उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांची देखील कौतुक केले. शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी जत येथील युथ फॉर जत या सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.