

मांगले : पतीने दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केला. वादाचे पर्यवसान खुनात झाले. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28, रा. मांगले, ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर मृतदेहाचे हात-पाय मोडून तो विद्युत पंपाच्या लोखंडी पेटीत घालून मंगेश चंद्रकांत कांबळे (35, सध्या रा. मांगले, मूळ गाव कोकरूड, ता. शिराळा) हा स्वतःहून पोलिसांत हजर झाला. ही घटना गुरुवार, दि. 27 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कांबळे कुटुंब मूळचे कोकरूड येथील रहिवासी. संशयित मंगेश हा पत्नी प्राजक्ता, मुलगा शिवम (वय 6) आणि मुलगी शिवन्या (वय 3) यांच्यासह कामानिमित्त मुंबईस असतो. त्याची आई, भाऊ नीलेश पंधरा वर्षांपासून मांगले येथे भाड्याने घर घेऊन राहतात. सध्या ते मांगले - कोडोली मार्गावर जोतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात भाड्याने राहत आहेत. चार दिवसापूर्वी मंगेश हा पत्नी व मुलांसह मुंबईहून मांगलेत आई आणि भावाकडे आला होता.
गुरुवारी सकाळी मंगेशचा भाऊ नीलेश व आई देववाडी येथे एका नातेवाईकाच्या रक्षाविसर्जनासाठी गेले होते. त्यामुळे घरी मंगेश, पत्नी प्राजक्ता व दोन्ही मुले होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास मंगेश व प्राजक्ता यांच्यामध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात मंगेशने प्राजक्ता यांचा ओढणीने गळा आवळला. काही क्षणातच त्यांच्या हालचाली थंडावल्या. त्या मृत झाल्याचे पाहून संशयिताने मृतदेहाचे हात-पाय मोडून तो बाजूच्या खोलीत घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घातला. त्यावर अंथरूण टाकून पेटी झाकली. खोलीला बाहेरून कुलूप घालून, भाऊ नीलेश याला फोन करून ‘मी शिराळ्याला जाणार आहे, गाडी घेऊन लवकर ये’ असा निरोप दिला. यानंतर भाऊ देववाडीतून मांगलेत आला. त्याच्याकडून गाडी घेऊन संशयित शिराळ्याकडे निघून गेला. यादरम्यान मंगेशचा मुलगा शिवम दारातच रडत बसला होता. नीलेशने त्याला ‘काय झाले’ असे विचारले असता; शिवमने त्याला ‘मम्मी-पप्पांचे भांडण झाले. पप्पांनी आईला मारून खोलीत पेटीत ठेवले,’ असे सांगितले. त्यानंतर नीलेशने मंगेशला फोन करून ‘कुठे आहेस?’ असे विचारले, त्यावेळी त्याने आपण शिराळा येथे गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले. त्यानंतर नीलेशने देववाडी येथून बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतले. मंगेशला फोनवरून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांबण्यास सांगितले. सर्वांनी गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन मंगेशला गाठले. यावेळी त्याने प्राजक्ताचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांनीही त्याला ‘याबाबत तू पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दे’ असे सांगितले. त्यानंतर संशयित मंगेश स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला.
दुपारनंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत प्राजक्ता यांची आई व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत प्राजक्ता यांची आई रजनी जाधव यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. तपास निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत.
प्राजक्ता यांचा मृतदेह सायंकाळी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. यावेळी त्यांच्या आईने फोडलेला टाहो मन सुन्न करणारा होता. ‘माझ्या पोरीला मारलं, तिने काय चूक केली’, असा तिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी व घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. शिराळा पोलिस ठाण्याच्या आवारात प्राजक्ता यांची मुले मावशीच्या कुशीत केविलवाण्या चेहर्याने बसली होती.