

सांगली : जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी 30 जूनपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवून घ्यावी अन्यथा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिला. वाहनांना एचएसआरपी (उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट) बसविण्यासाठी शासनाने आता 30 जूनपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. जिल्ह्यात एकूण 5 लाख 59 हजार 297 पैकी 3 लाख 20 हजार 507 वाहनधारकांनी आतापर्यंत एचएसआरपी बसवला आहे. याची टक्केवारी 57.31 टक्के आहे.
ज्या वाहनांना अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट बसविलेली नाही, अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून शुल्क भरावे व वेळ नोंदणी नोंदणी घेऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी, इतर कोणत्याही संकेतस्थळावर नोंदणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पुर्ननोंदणी, वाहनावरील बोजा उतरविणे, अशा महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. 2019 नंतरच्या वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवण्यात आलेल्या आहेय.
1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांनाही एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गत वर्षापासून एचएसआरपी बसवण्यास वेळोवेळी मुदतवाढ करण्यात आली आहे. 31 मार्चरोजी याची मुदत संपली होती. यामुळे कधीही कारवाई सुरु होईल, अशी भीती होती. आता शासनाने पुन्हा 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 1 जुलैनंतर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले.