

शिराळा शहर : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे गुरुवार, दि. 18 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. आगीत शिवाजी आप्पा पाटील यांच्या घराचे मोठे नुकसान झाले, तसेच जनावरांसाठी ठेवलेली वैरण आगीत जळून खाक झाली.
याबाबत माहिती अशी की, शिवाजी पाटील यांना त्यांच्या जुन्या घरातील इलेक्ट्रिक मीटरमध्ये ठिणग्या पडताना दिसल्या. या ठिणग्या खाली असलेल्या कचऱ्यावर पडल्या आणि आग लागली. ही आग जवळच साठवून ठेवलेल्या वैरणीपर्यंत पसरली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले. भिंतींचे रंग आणि प्लास्टरचे नुकसान झाले. प्लंबिंगचे साहित्य, इलेक्ट्रिक वायरिंग, जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा खाक झाला.
आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. अनिल पाटील, प्रकाश पाटील, निवास पाटील, विलास पाटील, अनिकेत कदम आणि सर्जेराव घेवदे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच राजेंद्र पाटील, वीज वितरणचे आर. डी. रसाळ, सुनील पाटील, तलाठी सुरैया शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.