

जत : हिवरे (ता. जत) येथील एका विवाहितेला हुंड्यासाठी तसेच इतर कारणांवरून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासरे आणि तीन नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री तानाजी यमगर (वय 27, मूळ रा. हिवरे, सध्या रा. कंठी) यांनी जत पोलिस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हंटले आहे की, 2017 पासून आजपर्यंत त्यांचे पती तानाजी दामू यमगर, सासरे दामू सोना यमगर, ताई शामराव कोळेकर (रा. आरेवाडी, ता. कवठेमंहकाळ), नंदा सुखदेव कचरे (रा. हिवरे) आणि राणी संतोष चौगुले (रा. कुपवाड, ता. मिरज) यांनी संगनमत करून त्यांना वारंवार त्रास दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर भाग्यश्री यांना माहेरच्यांनी मानपान केला नाही आणि बाहेरून चार लाख रुपये आणले नाहीस, अशा कारणांवरून शिवीगाळ, दमदाटी तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भाग्यश्री यमगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस नाईक घारगे करत आहेत.