

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, 31 मार्च 2025 पूर्वी वाहनावर या नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील सुमारे तेरा लाख वाहनांना आता ही नवी नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे.
या एचएआरपी प्रणालीमध्ये युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयएन) आणि लेसर कोड यासारख्या वैशिष्ट्यांसह नोंदणी प्लेट्स असा असणार आहेत. यामुळे यात छेड-छाड करून बदल करता येत नाही. यामुळे त्या वाहनांशी संबंधित गुन्ह्यांचे परीक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी या नंबर प्लेटस् सहाय्यभूत ठरणार आहेत. ज्या वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केलेली आहे, त्यांनी आता या सूचनांचे पालन करणे आणि त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी लावणे अनिवार्य आहे.
जुन्या वाहनांवर एच एस आर पी लागू करण्याची प्रक्रिया संकेतस्थळाला भेट देऊन एचएसआरपी ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट हे वाहन विक्रते बसवून देणार आहेत. यासाठी दुचाकीला 581 रुपये शुल्क असून इतर वाहनासाठी शुल्क वेगवेगळे आकारण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे तेरा लाख वाहने असून या सर्वांनी आता नव्याने नंबन प्लेट लावावी लागणार आहे.
उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी बसवण्यासाठी शासनाच्या वेबसाईट लिंकला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा) ते निवडल्यानंतर बटणावर क्लिक करा. हे तुम्हाला अधिकृत एच एस आर पी प्रक्रियेच्या संकेतस्थळावर घेऊन जाणार आहे. वाहनाची संबंधित मूलभूत माहिती वाहन प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासह भरावी. एचएसआरपी शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या नजीकच्या एजन्सीमध्ये जाऊन नंबर प्लेट लावावी लागणार आहे.