

ऐतवडे बुद्रुक : सर्वसोयीने युक्त, समृद्ध असणारा आणि जलद गतीने विकसित होणारा तालुका म्हणून वाळवा ओळखला जात आहे. त्या तालुक्याच्या गाभ्यात अजूनही एका जिवंत इतिहासाचा ठसा उमटलेला आहे. तो म्हणजे जुने वाडे. फक्त दगड-विटांचे बांधकाम नसून ते काळाची साक्ष देणारे आहेत. पिढ्यानपिढ्यांचे नातेसंबंध जपणारी मराठी संस्कृतीची सजीव प्रतीकेच आहेत.
‘वाडा’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ते प्रशस्त अंगण, लाकडी खांब, भिंतीवर लावलेली देवी, देवतांची चित्रे, तुळशी वृंदावन, खालची आढी, वरचे माजघर आणि तिथे वावरणारी चार पिढ्यांची माणसं हे केवळ वास्तुकलेचे नमुने नव्हे, तर अनेक आठवणी, संस्कार, सुख आणि दुःख यांना सामावून घेणारे जिवंत अवकाश.
या वाड्यांचे विशेष म्हणजे एकाच छताखाली आजोबा- आजींपासून नातवंडांपर्यंत राहणारा एकत्र परिवार. सकाळी तुळशीच्या पूजेला सुरुवात, सायंकाळी भजन अंगणात एकत्र जेवण आणि माज घरात आजीने सांगितलेल्या गोष्टी ही जीवनशैली फक्त वास्तूमध्ये नाही, तर मनात खोलवर रुजलेली होती. मात्र आता ही संस्कृती कुठे लोप पावत चालली आहे. या वाड्यांमधील लग्न, बारसे, गणपती उत्सव, असे सोहळेे हे नात्यांच्या घट्टपणाचे पुरावे होते. वाडा म्हणजे घर नव्हे, तर ती एक संस्कृतीची पाठशाळा होती.