तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना आज (दि.२) सायंकाळच्या सुमारास गारपिटीने झोडपले. मणेराजुरी, सावर्डेसह आसपासच्या भागांमध्ये जोरदार वा-यासह आलेल्या पावसात गारपीट झाली. बुधवारी सकाळपासून तालुक्यात उष्णता वाढलेली होती. दुपारनंतर पाऊस येईल असा अंदाज होता, तो खरा ठरला. सायंकाळच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांशी गावांमध्ये वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने झोडपले.
मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीने मणेराजुरी आणि परिसरातील पीक छाटणी घेण्यात आलेल्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या वेलीवरील काड्या मोडून गेल्या असून या पावसामुळे द्राक्षघड रोगाला बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. मणेराजुरीमध्ये भोसले नगर, एरंडोले मळा, लांडगे मळा, अडके खोरे, रामलिंग नगर, आप्पा- गुणाजीचा मळा, जमदाडे वस्ती यल्लामा मंदिर येथे गारासहित मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे.