

सांगली ः पुढारी वृत्तसेवा
सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात सोमवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
या पावसाचा काढणीस आलेल्या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्याशिवाय द्राक्षबागा, भाजीपाला आदी पिकांनाही फटका बसला आहे. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतरही पाऊस सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरात तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शासकीय रुग्णालय, गणेश नगर, दत्त-मारुती रस्ता, स्टेशन रोड यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. जोरदार पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
गोटखिंडी : वाळवा तालुक्यातील गोटखिंडी, बावची परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी सातपासून विजांच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस बरसला. दिवसभर वातावरणामध्ये उष्मा जाणवत होता. सायंकाळी सहापर्यंत पावसाचे वातावरण नव्हते. परंतु सात वाजता पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.