

सांगली : आठ दिवस कोसळणार्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाच जिल्हा मार्गांवर पाणी आले आहे. या सर्व मार्गांवरील वाहतूक दोन दिवसापासून बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.
तासगाव तालुक्यातील जुना सातारा रस्ता ते तासगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 266 वासुंबे ते मतकुणकीदरम्यानच्या तांदळे वस्तीजवळील पूल 24 मेरोजी दुपारी बारा वाजल्यापासून पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक निमणी-तुरचीमार्गे सुरू करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील नागठाणे, पलूस, राजापूर मार्गावर राजापूर गावाजवळील फरशी पुलावर पाणी आल्याने हा मार्ग शनिवारी दुपारपासून बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नरसेवाडी-हातनूरमार्गे सुरू करण्यात आली आहे.
तासगाव तालुक्यातील नरसेवाडी - गव्हाण - शिरढोण रस्त्यावरील पेड गावाजवळील पुलावर पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक नरसेवाडी - हातनूरमार्गे वळवण्यात आली आहे. कडेगाव तालुक्यातील ढवळेश्वर, कमळापूर, देवराष्ट्रे रस्ता, रामापूर येथील पूल पाण्याखाली आहेत. हा रस्ता 21 मेपासून बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर हिंगणगाव, उपाळे, अमरापूर रस्ता शिंदेनगर ते चिखलीदरम्यान पाण्याखाली गेला आहे. हा रस्ता 26 मेरोजी दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आला आहे, मात्र तो पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आठ दिवसांपासून कोसळणार्या जोरदार पावसामुळे रविवारपासून पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये बहे (ता. वाळवा), डिग्रज (ता. मिरज), सांगली, म्हैसाळ (ता. मिरज) आणि राजापूर (कोल्हापूर) या बंधार्यांचा समावेश आहे.