Sangli News : सांगली महापालिकेचे सभापती-ठेकेदारांची चौकात जुंपली

पूरनियंत्रण, पाणी निचऱ्याच्या ५९२ कोटींच्या कामावरून पेटला वाद : काम बंद पाडले; महापालिका वर्तुळात वेगळीच चर्चा
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

सांगली : पूरनियंत्रण, पावसाळी पाणी निचराअंतर्गत जागतिक बॅंकेकडून मंजूर झालेल्या ५९२ कोटी रुपयांच्या कामावरून महापालिकेचे स्थायी सभापती अतुल माने व ठेकेदार यांच्यात सोमवारी येथील विश्रामबागमधील स्फूर्ती चौकात चांगलीच जुंपली. सभापतींनी कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वीच काम सुरू केल्यावरून जाब विचारत सर्वेक्षण बंद पाडले. सभापती व ठेकेदारात जोरात वादावादी झाली. दरम्यान, या वादामागील नेमके कारण काय?, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. टक्केवारीची चर्चाही सुरू आहे.

महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत महापालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सांगलीतील शामरावनगर व परिसरातील पूर व पावसाचे साचून राहणारे पाणी हरिपूर नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे, शामरावनगर, गंगोत्रीनगरमध्ये साचून राहणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरीनाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, तीन किलोमीटर लांबीचा काँक्रीटचा नाला बांधणे, मिरजेतील मालगाव रोड, वड्डी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, गटारीचे बांधकाम, नाल्यांवरील पाईप मोऱ्याऐवजी बॉक्स टाईप कलव्हर्ट बांधणे, आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

या कामांसाठी १८ निविदा आल्या होत्या. त्यातून मुंबईतील एका ठेकेदार कंपनीला काम निश्चित झाले आहे. मात्र अजून कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी महासभेत या प्रकल्पावर वादळी चर्चा झाली होती. नगरसेवकांनी अनेक सूचना मांडल्या होत्या. सदस्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्यावरून नगरसेवकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. दरम्यान, ठेकेदाराने कामास सुरुवात केल्याची माहिती मिळताच स्थायी समिती सभापती अतुल माने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्फूर्ती चौकात गेले आणि जाब विचारला. कार्यारंभ आदेश नसताना काम कसे सुरू केले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यातून वादावादी सुरू झाली. भर चौकात रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. त्यामुळे नागरिकांचीही गर्दी झाली होती. सभापती अतुल माने यांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडले.

काम सुरू करण्यापूर्वी प्रत्यक्षात हे काम कसे पूर्ण करणार, याचा तपशीलवार तांत्रिक आराखडा महापालिकेमार्फत शासनाच्या ‘मित्रा’ या संस्थेला सादर करायचा असल्याने सर्वेक्षणाचे काम सुरू होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र सभापती -ठेकेदार यांच्यातील वादावादीच्या या प्रकाराची शहरभर चर्चा रंगली आहे. काम बंद पाडण्यामागील नेमके कारण काय?, यावरून खुमासदार चर्चाही रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news