सांगली : गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत आणि त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याची गरज पडू नये, यासाठी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी येथे केले.
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उदघाटन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण व केंद्र पुरस्कृत ईडब्ल्यूएस योजनेअंतर्गत लेक्चर हॉल व वसतिगृहांच्या कामांचे भूमिपूजन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या अनुषंगाने येथील शासकीय रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या निधीमधून सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मंजूर करण्यात आले. त्यातील 5 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाने सुमारे 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा मॉड्युलर आयसीयु राज्य शासनाच्या निधीतून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोफत तसेच कमी पैशांमध्ये वैद्यकीय सुविधा देणे शक्य झाले आहे. शासनाने राज्यात पहिली डिजिटल ब्रेन ॲन्जीओग्राफी मशीन मिरज मध्ये मंजूर करून सुरू केली आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. याशिवाय रुग्णालयात लिथोट्रिप्सी, आधुनिक लॅप्रोस्कोपी, इको व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रास्ताविक वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी मानले.