

सांगली : आमदार अरुण लाड यांनी दिलेला शब्द पाळायला हवा. त्यासाठी मुलगा शरद लाड यांची त्यांनी समजूत काढावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अश्वमेध यज्ञाचा घोडा आता काही थांबणार नाही, असेही ते म्हणाले.
पुणे पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी मेळाव्यासाठी ते सांगलीत आले होते. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इच्छुक उमेदवार प्रताप माने, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले की, अरुण लाड यांनी गेल्या विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदार संघातून लढण्याआधी प्रताप माने यांना शब्द दिला होता. 'मी एकदा लढतो, पुढच्यावेळी तुम्ही लढा', असे आमच्यासमोर सांगितले होते. आता त्यांनी शब्द पाळायला हवा. त्यासाठी मुलगा शरद लाड यांची त्यांनी समजूत काढायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेसचा यावेळचा उमेदवार कोण असेल, हे माहिती असल्यानेच शरद लाड यांनी भाजपचा रस्ता धरला.
ते म्हणाले की, पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपने ही जागा मागितली तरी, आम्ही त्यांना समजून सांगू. कारण, माने यांचे शिक्षण क्षेत्रातील काम प्रभावी आहे. जेन-झीचे प्रश्न समजून घेण्याची, ते सोडवण्याची त्यांची क्षमता आहे. गेल्यावेळी त्यांनी माघार घेतली, कारण अरुण लाड यांनी आग्रह केला.
जेन-झी सत्तेविरोधात नाही
जेन-झी सत्तेविरोधात नाही, ती पेपरफुटीच्या विरोधात आहे. त्यांचे प्रश्न शांतपणे सोडवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.