

मिरज : गांधीधाम ते बंगळूर एक्स्प्रेसमध्ये दोन महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या हरियाणामधील सराईत टोळीला दिल्ली विमानतळावरून बेड्या ठोकण्यात आल्या. मिरज रेल्वे, पुणे रेल्वे, पुणे रेल्वे सुरक्षा दल आणि दिल्ली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. टोळीतील पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुलदीप (वय 34), अजय (वय 36), हवा सिंग (वय 65, तिघे रा. जिंद, हरियाणा), अमित कुमार (वय 35), मोनू (वय 32, दोघे रा. भिवानी, हरियाणा) यांचा समावेश आहे. गांधीधाम-बंगळूर एक्स्प्रेसमध्ये दि. 29 नोव्हेंबर रोजी शिवानी प्रतीक जाधव आणि रेखा मनोजकुमार मालपाणी या प्रवास करीत होत्या. याच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 8 जणांच्या टोळीने शिवाजी जाधव यांच्या 3 लाख रुपयांच्या, तर रेखा मालपाणी यांच्या 23 तोळे सोन्यावर डल्ला मारला होता. याबाबत मिरज रेल्वे पोलिस आणि संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मिरज रेल्वे पोलिस, पुणे रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल या घटनेचा तपास करीत होते.
मिरज रेल्वे पोलिसांची मिरज यार्डमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर यामध्ये 8 जण आढळून आले होते. त्यांचा माग काढला असता सुरुवातीला ते सांगली बस स्थानक, त्यानंतर कोल्हापूर व तेथून गोव्यात गेल्याचे समोर आले. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच पाच जणांनी गोव्यातून विमानाने दिल्लीकडे पलायन केले होते. यावेळी सुरू असणाऱ्या तांत्रिक तपासादरम्यान त्यांचे लोकेशन पोलिसांना मिळून आले. त्यानंतर तातडीने दिल्ली गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आली.
गोव्यातून निघालेले विमान दिल्लीत पोहोचेपर्यंत दिल्ली गुन्हे शाखेने विमानतळावर सापळा लावला. वरील पाचही संशयित दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अद्याप चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. त्यांना दिल्लीतून मिरजेत आणण्यात आले. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांचे पसार झालेले अन्य तीन संशयित व चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत अद्याप मिळालेला नसल्याने न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिरज रेल्वे पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
रेल्वे पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, रेल्वेेचे अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, मिरज रेल्वे पोलिस निरीक्षक सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, हवालदार अमर सावंत, मोहसीन पटेल, तौफीक पटेल, अन्सार मुजावर, सूर्यकांत कांबळे यांच्यासह पुणे रेल्वे पोलिसांनी ही कामगिरी केली.
सांसी टोळीचे देशभर रॅकेट!
अटक करण्यात आलेल्या सांसी टोळीचे देशभरात रॅकेट आहे. गांधीधाम ते बंगळूर या एक्स्प्रेसमध्ये त्यांनी ही चोरी केली. दरम्यान त्यांनी यापूर्वीही रेल्वे चोऱ्या केल्या असण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी रेल्वेतून उतरून, सांगली, कोल्हापूर आणि गोवामार्गे दिल्लीला पलायन केले होते. त्यामुळे ते यापूर्वी मिरजेत आले होते का? याचाही तपास आता केला जात आहे.