

सांगली : वाढत्या उष्णतेमुळे यंदा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याच्या हंगामाचा कालावधी मोठ्या प्रमाणात घटला. जवळपास दोन महिने चालणारा हंगाम कसाबसा ३५ ते ४० दिवस चालला.
यंदा फळधारणा कमी झाल्यामुळे उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट झाली. याचा थेट परिणाम म्हणून बाजारात आवक कमालीची कमी झाली आणि दर आवाक्याबाहेर गेले. अपुऱ्या आवकेमुळे बाजारात अस्सल हापूसचे दर खूप चढे राहिले. देवगड व रत्नागिरी हापूसचे प्रति डझन दर साधारणपणे ५०० ते ७०० रुपये राहिले. यंदा हंगाम २५ एप्रिल ते सर्वसाधारपणे ३० मेपर्यंत राहिला. प्रत्येक वर्षी हा हंगाम १० ते १५ एप्रिलपासून ते मेअखेरपर्यंत चालतो. यंदा हा हंगाम खूपच घटला.
कर्नाटक हापूस, तोतापुरी, पायरीचा हंगामही यावर्षी उशिरापासून प्रारंभ झाला आहे. २० एप्रिलपासून याची आवक सुरु झाली. गेल्या पंधरवड्यापासून या आंब्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली. यंदा कर्नाटक हापूसे सर्वसाधारणे दर दीडशे ते दोनशे रुपये डझन राहिले.
विष्णुअण्णा फळ मार्केटमधून सांगली जिल्ह्यासह जयसिंगपूर, सांगोला, कर्नाटकमधील अथणी, कागवाड, चिकोडी तालुक्यात विक्री झाली. यंदा कोकणातील आंब्याच्या बागा सांगलीतील वीसभर व्यापाऱ्यांनी घेतल्या होत्या.