आटपाडी : बलात्कारातील आरोपीला फाशी द्या

आटपाडीत मागणी : कडकडीत बंद, नागरिकांचा भव्य मोर्चा; पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
Sangli News
आटपाडी : बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी काढलेला भव्य मोर्चा.Pudhari Photo
Published on
Updated on

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या संग्राम देशमुख या नराधमाच्या निषेधार्थ शुक्रवारी आटपाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत भव्य मोर्चा काढून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देण्यात आला. शहरात जीम चालविणार्‍या संग्राम देशमुख याने एका अल्पवयीन मुलीस कारमधून पळवून धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आटपाडीकरांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारीपेठेत शुकशुकाट होता.

सकाळी 10.30 वाजता भव्य मोर्चा निघाला. मोर्च्यात महाविद्यालयीन मुली, युवक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, ‘नराधमाला फाशी द्या’, अशा घोषणा देत मुख्य बाजारपेठ, बाजार पटांगण ते पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संग्राम देशमुखवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम तसेच त्याला मदत करणार्‍या सुमित्रा लेंगरेवर ठोस कारवाई व्हावी, या मागणीसाठी नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. अत्याचार करणार्‍यास चौका-चौकात फोडून काढा. गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी दयामाया करू नका.

ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, गुन्हेगाराची धिंड काढा. अशा प्रवृत्तीस पाठिंबा देणार्‍यांना त्यांची जागा दाखवा. गुन्हेगारांना कस्टडीत वेगळी वागणूक दिल्यास पोलिस अडचणीत येतील. जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. यू. टी. जाधव, चंद्रकांत काळे, पृथ्वीराज पाटील, राजेंद्र खरात, अनिता पाटील, गुलशन वंजारी, नितीन कुलकर्णी, स्नेहजित पोतदार, अरुण वाघमारे, चंद्रकांत दौंडे यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चास पत्राद्वारे पाठिंबा दिला. सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील लोकही मोर्च्यात सहभागी झाले होते. तहसीलदार सागर ढवळे आणि पोलिस निरीक्षक विनय बहिर यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news