

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणार्या एकास मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली. चिदानंद चंद्रशेखर नेसरगी (वय 48, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 15 लाख रुपयांचा गुटखा आणि सात लाख रुपयांचा टेम्पो असा 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असणार्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद यांनी दिले होते. यानुसार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पथक तपास करीत होते. यावेळी उपनिरीक्षक अझर मुलानी यांना कर्नाटकातून मिरजच्या दिशेने एका टेम्पोतून गुटख्याची अवैधररीत्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने म्हैसाळ येथील पंपगृहाजवळ सापळा रचला होता.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित टेम्पो (क्र. केए 23 बी 5438) आला असता पोलिसांनी तो अडविला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा, सुगंधी पानमसाला मिळून आला. याप्रकरणी चिदानंद नेसरगी याला अटक करून टेम्पोसह गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.