

मिरज : एकेकाळी पोलिसांनी फरफटत नेलेल्या गुन्हेगाराच्या टोळीने मिरजेत मध्यरात्री हैदोस घातला. त्याच्यासह त्याच्यावर हल्ला करणार्या टोळीने देखील हत्यारे नाचवत हल्ला चढविला. त्यामुळे एकाच टोळीत हा भडका उडाला. या गुन्हेगारांच्या कोयता गँगच्या दहशतीमुळे मिरजेत त्यांचे ‘गुंडाराज’ निर्माण झाले आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
मिरजेत हॉटेल मालक आणि एकाच्या आर्थिक देवाण-घेवाणीत मध्यस्थी केल्याने कोयत्याने खुनीहल्ला केला, तोही त्याच्याच ओळखीच्या गुन्हेगारांनी. त्यानंतर त्या गुन्हेगाराच्या टोळीने संबंधित हल्लेखोरांच्या घरांवर जोरदार प्रतिहल्ला चढविला. चार ते पाच हल्लेखोरांच्या घरांची व वाहनांची तोडफोड करीत अक्षरश: धुडगूस घातला. मिरज संवेदनशील शहर. या ठिकाणी कर्तबगार आणि डॅशिंग पोलिस अधिकार्यांची नेमणूक यापूर्वी करण्यात येत होती. परंतु कालांतराने या ठिकाणी मवाळ अधिकारीच नेमले जात असल्याचे स्पष्ट होते.
मिरजेत अनेक गुन्हेगार फाळकूट टोळीचे म्होरके आहेत. अनेकांनी टोळीच्या साहाय्याने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मिरजेत काहीजण सराईत गुन्हेगार बनून दहशत निर्माण करण्याच्या उंबरठ्यावर असताना तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी गुन्हेगारांना अक्षरश: फरफटत नेत त्यांची दहशत मोडीत काढली होती. पोलिसांचा दरारा निर्माण केला होता. तसेच किरकोळ मारामार्या करून दहशत निर्माण करणार्यांचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी कंबरडे मोडले होते. परंतु त्यानंतर पुन्हा काही टोळ्यांनी मिरजेत जम बसवला. काही जणांनी तर मिरजेत चांगलेच हात-पाय पसरलेत. गेल्या महिन्यात व्यावसायिक स्पर्धेतून दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीत धुडगूस झाला होता. यातून एका हॉटेलची देखील तोडफोड केली होती. परंतु यामध्ये कारवाईचा केवळ ‘फार्स ’ करण्यात आला.
मिरजेत अनेक छोट्या-मोठ्या टोळ्यांनी आता डोके वर काढले आहे. त्यांचा बीमोड करणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढणे गरजेचे आहे. मिरजेत यापूर्वी ज्या ज्या गुन्हेगारांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे कंबरडे मोडण्याचे काम यापूर्वीच्या पोलिसांनी केले आहे. तसे पुन्हा व्हावे, अशी अपेक्षा.
मिरजेत सहा महिन्यांपूर्वी कोयता टोळीने दहशत निर्माण केली होती. यामध्ये काही अल्पवयीन गुन्हेगारही होते. मिरजेत अनेक छोट्या-मोठ्या कोयता टोळ्या उदयास आल्या आहेत. पुण्यात कोयता टोळी मोडीत काढण्यासाठी पोलिसांना जवळपास यश आले आहे. पुण्यात कोयता टोळीची पोलिसांनी अक्षरश: धिंड काढली. मिरजेतील गुन्हेगारांची देखील धिंड काढून मिरजेतील फाळकूट गुन्हेगारांच्या कोयता टोळीची दहशत आता मोडीत काढण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी आपला खाक्या दाखविण्याची वेळ आली आहे.
तत्कालीन पोलिस निरीक्षक मदन चव्हाण, बाजीराव पाटील, रणजित धुरे, राजू ताशिलदार, राजेंद्र कुंटे, शिवाजी आवटी या अधिकार्यांचा मिरजेत दबदबा होता. या अधिकार्यांना पाहताच गुंडाच्या पायाखालची वाळू सरकायची. त्याचबरोबर तत्कालीन डीबी पथकात असणारे आकीब काझी, संजय चव्हाण, साईनाथ ठाकूर, बाशा पाटील यांना पाहताच गुन्हेगारांची पळताभुई थोडी व्हायची. तत्कालीन डीबी पथकाने शहरातून फेरी मारल्यानंतर भल्या-भल्यांची बोबडी वळायची. परंतु मिरजेतील पोलिसांचा हा दरारा आता का राहिला नाही?
पोलिसांपासून बचावासाठी तसेच दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक गुन्हेगारांनी राजकीय पक्षाचा आश्रय घेतल्याचे दिसून येते. ते सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाला गेल्याने पोलिसी कारवाईपासून बचाव होईल, अशी त्यांची समजूत असते. त्यामुळे अनेक नामचीन गुन्हेगारांनी राजकीय पक्षाचा आश्रय घेतला. पोलिसांनी अशा फाळकुटांची तमा न बाळगता कठोर पावले उचलण्याची गरज आहे.